Global Warming Climate Change News: गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक तापमानवाढीवर निरनिराळ्या स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांपासून अनेक आंतरराष्ट्रीय संघटना, देशोदेशीच्या पर्यावरणप्रेम संघटना व पर्यावरणतज्ज्ञ यावर सातत्याने भूमिका मांडत आहेत. मात्र, तरीही जागतिक पातळीवर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार अत्यंत कमी लोकसंख्येकडून करण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढीचे चटके वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात बसू लागले आहेत. आता यासंदर्भात अवघ्या मानवजातीला धोक्याची घंटा ठरणारा एक अहवाल समोर आला असून त्यानुसार गेले १२ महिने हे पृथ्वीतलावर नोंद करण्यात आलेले सर्वात उष्ण १२ महिने होते!

‘क्लायमेट रीसर्च’ या समाजसेवी विज्ञान संशोधन संस्थेकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. यानुसार, नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ हा कालखंड पृथ्वीतलावर नोंद करण्यात आलेल्या तापमानातील सर्वात उष्ण तापमानाचा काळ होता. कोळसा, नैसर्गिक वायू, इतर इंधनाच्या ज्वलनामुळे पृथ्वीचं तापमान वाढवणारे कार्बनडाय ऑक्साईडसारखे वायू बाहेर पडत आहेत. त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढू लागलं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

काय सांगते आकडेवारी?

या वर्षभरात पृथ्वीवरील जवळपास ७.३ बिलियन अर्थात ९० टक्के लोकसंख्येला किमान १० दिवस अतीउष्ण दिवसांचा अनुभव आला. हे प्रमाण सामान्य तापमानापेक्षा तप्पल तीन पट अधिक असल्याचीही नोंद झाली. या काळात सरासरी जागतिक तापमान १.३ अंश सेल्सिअस नोंद झालं. पॅरिस करारानुसार जागतिक स्तरावर सगळ्यांनीच मान्य केलेल्या १.५ अंश सेल्सिअस मर्यादेच्या हे अगदी जवळ पोहोचल्याचं दिसत आहे.

पशुपालनामुळे जागतिक तापमान वाढ? नेमकी कारणे कोणती?

“लोकांना हे माहिती आहे की गोष्टी फार विचित्र झाल्या आहेत. पण त्या का विचित्र झाल्यात, हे मात्र लोकांना समजत नाहीये. कारण ते वास्तवाकडे बघत नाहीयेत. आपण अजूनही कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू जाळत आहोत”, अशी प्रतिक्रिया क्लायमेट सेंट्रलचे वैज्ञानिक अँड्र्यू पर्शिंग यांनी दिली आहे.

“कुणीच सुरक्षित नाही”

“मला वाटतं या वर्षी समोर आलेल्या आकडेवारीतून एक गोष्ट ठळकपणे समोर आली आहे. ती म्हणजे कुणीच सुरक्षित नाही प्रत्येकाला वर्षभरात कधी ना कधी असामान्य अशी उष्णता अनुभवायला मिळाली आहे”, असंही पर्शिंग यांनी नमूद केलं. “हे म्हणजे आपण सरकत्या जिन्यावर उभं राहायचं आणि आश्चर्य व्यक्त करायचं की आपण वर कसे जात आहोत! सगळ्यांना कल्पना आहे की जागतिक तापमानवाढ होत आहे. गेल्या काही दशकांपासून त्याचे अंदाज वर्तवले जात आहेत”, अशी प्रतिक्रिया कोलंबिया विद्यापीठातील हवामान तज्ज्ञ जेसन स्मरडॉन यांनी दिली.

तापमान वाढलं, काय दिसतायत लक्षणं?

जागतिक तापमान असामान्यपणे वाढत असल्याची ठळक लक्षणं दिसू लागली आहेत.

१. प्रमाणाबाहेर तापमान वाढल्यामुळे पावसाचं गणित विस्कळीत झालं आहे. कारण उष्ण तापमानात हवेतील बाष्प जास्त प्रमाणात धरून ठेवलं जातं. त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा अनेकदा वादळाची स्थितीही निर्माण होते. आफ्रिकेतील अशाच स्टॉर्म डॅनियलनं किमान ४ ते ११ हजार लोकांचे बळी घेतले आहेत.

२. भारतात १.२ बिलियन लोकसंख्या अर्थात जवळपास ८६ टक्के लोकसंख्येला वर्षभरात किमान ३० दिवस तरी जागतिक सरासरीपेक्षा तीन पट अधिक तापमानाचा अनुभव आला.

३. ब्राझीलमध्ये दुष्काळात नद्या इतिहासात कधीच नव्हत्या इतक्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नागरिक स्वच्छ ताजं पाणी आणि अन्नापासून वंचित राहू लागले आहेत.

४. अमेरिकेत या वर्षभरात ३८३ लोकांचा हवामानातील जीवघेण्या बदलांमुळे मृत्यू झाला. त्यातले ९३ मृत्यू हे एकट्या माऊई वणव्यामुळे (अमेरिकेतील शंभर वर्षांतला सर्वात भीषण वणवा) झाले.

५. कॅनडामध्ये दर २०० लोकांमध्ये एका व्यक्तीने वणव्यामुळे आपलं घर सोडलं आहे. अधिक काळ चालणाऱ्या उष्ण वातावरणामुळे हे वणवे दीर्घकाळ पेटते राहतात.

६. जमैकामध्ये गेल्या १२ महिन्यांत सरासरी जागतिक तापमानापेक्षा किमान चार पट अधिक उष्ण वातावरण अनुभवायला मिळालं. त्यामुळे देशात जागतिक तापमानवाढीचे सर्वाधिक परिणाम जाणवू लागले आहेत.

२०६० च्या दशकात जागतिक तापमानवाढ कळस गाठेल; हिमनद्या वाचविण्याची गरज का निर्माण झाली आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपण बदलत्या परिस्थितीत स्वत:च्या जीवनशैलीत बदल करून येणाऱ्या संकटासाठी आधीपासूनच तयार राहायला हवं. कारण जागतिक तापमान वाढीचा परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दिसत आहे”, अशी चिंता वॉशिंग्टन विद्यापीठातील सेंटर फॉर हेल्थ अँड ग्लोबल एन्व्हायर्नमेंटचे प्राध्यापक किस्टी एबी यांनी व्यक्त केली आहे.