दत्ता जाधव जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील सजीव विविध नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहेत. नव्या संशोधनानुसार जगभरात वाढलेल्या पशुधनामुळे जागतिक तापमान वाढीत भरच पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याविषयी… पशुधनामुळे मिथेनचे उत्सर्जन वाढले? ‘नेचर सस्टेनेबिलिटी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात जागतिक तापमान वाढीत पशुधन मोठी भर घालत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारत, चीन, ब्राझील, पाकिस्तान आणि सुदान आदी विकसनशील देशांतील वाढत्या पशुधनामुळे मिथेनचे पर्यावरणातील उत्सर्जन वाढले आहे. पशुधनाची पाचनक्रिया, श्वासोच्छ्वास, गुदमार्गे वायू उत्सर्जन, मुखमार्गे वायू उत्सर्जन आणि शेण-मूत्राच्या कुजण्याच्या प्रक्रियेतून वातारणात मोठ्या प्रमाणावर मिथेनचे उत्सर्जन होत असल्याचा दावा संशोधनातून करण्यात आला आहे. पशुधनाचा जागतिक तापमान वाढीत किती वाटा? जागतिक हरितगृह वायूच्या उत्सर्जनात पशुधनाचा थेट वाटा ५.८ टक्के आहे. पशुधनामुळे होणारी जंगलतोड आणि मातीची धूप आदी कारणांमुळे एकूण जागतिक तापमान वाढीत २३ टक्के भर पडत आहे. विकसनशील देशात पशू आणि पशू आधारित बाबींमुळे जागतिक तापमान वाढीत भर पडत असली तरीही ती विकसित देशांच्या औद्योगिक उत्सर्जनाच्या तुलनेत कमीच आहे. आफ्रिका आणि दक्षिण आशियात सुमारे एक अब्ज लोकांची उपजीविका थेट पशुधनाशी संबंधित आहे. त्यांच्यासाठी गाय, शेळ्या-मेंढ्यांचे संगोपन करून दूध, मांस उत्पादन करण्याला प्राधान्य दिले जाते. याच पशुधनाचा उपयोग शेतीतही केला जातो. जागतिक तापमान वाढीत एकूण पशुधनाच्या वाट्यात गोवंशांद्वारे होणारी तापमान वाढ जास्त आहे. जगातील १३२ गरीब, विकसनशील देशांतील पशुधन तापमान वाढीत मोठी भर घालत आहेत. त्यात भारत, चीन, ब्राझील, पाकिस्तान आणि सुदानमधील पशुधनाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. आणखी वाचा-तुरुंग बंदीवानांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण का वाढतेय? गायींचा मिथेन उत्सर्जनात किती वाटा? दुधासाठी केल्या जाणाऱ्या गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या उत्सर्जनाची समस्या जागतिक तापमान वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. एक गाय सरासरी ७० ते १२० किलो मिथेन प्रतिवर्ष तयार करते. जागतिक पातळीवर गायींची संख्या सुमारे १.५ अब्ज आहे. त्यामुळे मिथेन उत्सर्जनाच्या समस्येचे गांभीर्य सहज समजून येते. रवंथ करणाऱ्या प्राण्याच्या पचनसंस्थेमध्ये होणाऱ्या प्रक्रियेतून मिथेन मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. हा जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत आहे. गायींची पचनसंस्था योग्य प्रकारे कार्यरत राहण्यासाठी मिथेन तयार होणे आवश्यक असले तरीही त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे कमी मिथेन उत्सर्जन करणाऱ्या गायींच्या पैदाशींबाबत संशोधन केले जात आहे. कमी मिथेन उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास? कमी मिथेनचे उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करण्यावर जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. कॅनडा, ऑस्ट्रेलियातील ॲडलेड विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन सुरू केले आहे. त्यासाठी पचनसंस्थेतील सूक्ष्म जिवांशी जुळवून घेण्याच्या गायीच्या वैयक्तिक जनुकीय क्षमतेचा वापर केला जात आहे. गायी आणि अन्य रवंथ करणाऱ्या प्राण्यांद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण लक्षणीय आहे. गायींच्या पचनसंस्थेतील मिथेननिर्मिती करणाऱ्या सूक्ष्मजीवांची पातळी आणि प्रकार यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवणे त्यांच्या जनुकीय कार्यक्षमतेवर अवलंबून असते. कमी मिथेन उत्सर्जन करणाऱ्या गायींच्या जातींचा शोध घेऊन कमी मिथेन उत्सर्जित करणाऱ्या नव्या संकरित जातींची पैदास करण्यावर भर दिला जात आहे. आणखी वाचा-१० दिवसांत ५ चकमकीच्या घटना, जम्मू काश्मीरमध्ये हिवाळा सुरू होण्याआधी दहशतवादी कारवाया का वाढतात? जाणून घ्या… आहार बदलासह जनुकीय बदलही होणार? संशोधकांनी व्यापक प्रमाणावर संशोधन सुरू केले आहे. दुधाळ गायींच्या पचनसंस्थेतील सूक्ष्म जीवांच्या समुदायाचे विश्लेषण केले जात आहे. त्यासोबत गायीचा आहार, दूध उत्पादन, मिथेन उत्पादन आणि अन्य जैवरासायनिक गुणधर्मांच्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. यापूर्वी झालेल्या अभ्यासामध्ये आहारातील बदलांद्वारे मिथेन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे शक्य असल्याचे दिसून आले होते. आता गायींमध्ये जनुकीय बदल घडवून कायमस्वरूपी मिथेन उत्सर्जनावर उपाययोजना करता येईल, असे संशोधक सांगत आहेत. कमी मिथेन उत्सर्जन करणाऱ्या गायींच्या जातीची पैदास करतानाच गायींचे दूध उत्पादन, मांस उत्पादन आणि रोगप्रतिकारक शक्ती याबाबतचे काही निकष निश्चित करावे लागणार आहेत. मिथेनबाबत जग किती सतर्क? संयुक्त राष्ट्राने २०३० पर्यंत मिथेन उत्सर्जनात घट करण्याचे निश्चित केले आहे. अमेरिकेने २०३० पर्यंत मिथेन उत्सर्जनात २० टक्के कपात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ब्रिटनने वृक्ष लागवडीत वाढ करण्याचे निश्चित केले आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली ९० देशांनी एकत्र येऊन २०३० पर्यंत मिथेन उत्सर्जनात ३० टक्के कपात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मिथेन कार्बन डायऑक्साईडनंतर दुसऱ्या क्रमांकाचा वायू पृथ्वीचे नुकसान करणारा वायू आहे. जो जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत आहे. भारत, चीन, रशिया आणि ब्राझील मिथेन उत्सर्जनात आघाडीवरील देश आहेत. मिथेन उत्सर्जनामुळे १८ व्या शतकाच्या तुलनेत २०४० पर्यंत पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढेल. त्याचा परिणाम म्हणून ध्रुवीय बर्फ वितळणे आणि समुद्र किनाऱ्यावरील शहरे पाण्याखाली जाणे, उष्णतेच्या लाटा, अतिरेकी पाऊस, दुष्काळ, गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढणार आहे. dattatray.jadhav@expressindia.com