गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. केनेथ सिल्व्हेरा असे या व्यक्तीचे नाव असल्याचे सुत्रांकडून कळते. ही व्यक्ती गोव्यातील एक उद्योगपती आहे. १७ एप्रिल रोजी या व्यक्तीने आपल्या फेसबुक आकाऊंटवर पोस्ट लिहीली होती त्यात ‘नुकतेच कळते आहे की, पर्रिकर यांचा मृत्यू झाला’ असे लिहीले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी सिल्व्हेरा यांना अफवा पसरवल्याबद्दल ताब्यात घेतले. दरम्यान, स्वादुपिंडाच्या आजारावर सध्या अमेरिकेत उपचार घेत असलेले पर्रिकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच स्वगृही परततील असे भाजपाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
Goa Police Crime Branch arrested a man for spreading fake news on the health condition of Chief Minister Manohar Parrikar, who is undergoing treatment in the United States. (File Pic) pic.twitter.com/zbW7oZ8S7I
— ANI (@ANI) April 19, 2018
पर्रिकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतरच ते गोव्यात परतणार आहेत, असे भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्याच आठवड्यात गोवा भाजपाचे सरचिटणीस सदानंद तानवडे यांनी पुढील महिन्यांत भारतात परततील असे सांगितले होते.
पर्रिकर यांना १४ फेब्रुवारी रोजी पोटात दुखत असल्याने गोव्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, २२ फेब्रुवारी रोजी त्यांना गोवा विधानसभेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याच दिवशी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर त्यांना पुन्हा ५ मार्च रोजी लीलावतीत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी अमेरिकेतील रुग्णालयात हालवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्यांना अमेरिकेत उपचारांसाठी पाठवण्यात आले. दरम्यान, त्यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या कारभाराची जबाबदारी कॅबिनेट सल्लागार समितीतील वरिष्ठ मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.