Illegal Homestay Facility in Goa: गोवा हे बहुतेकांसाठी सुट्टी घालवण्याचं, निवांत होण्याचं, मित्र-मैत्रिणींसोबत आऊटिंग करण्याचं पहिल्या पसंतीचं ठिकाण. त्यामुळे कुठेही एकत्र बाहेर जाण्यासाठी तयार होणारी ठिकाणांची यादी गोव्याच्या समावेशाशिवाय पूर्ण होणं शक्यच नाही. त्यामुळे दरवर्षी गोव्याला लाखोंच्या संख्येनं पर्यटक भेट देतात, राहतात, मजा-मस्ती करतात आणि आपल्या घरी परततात. पण यामुळेच गोव्यातील स्थानिक व्यवस्थेवर ताण निर्माण होऊ लागला असून त्यातूनच काही बेकायदेशीर प्रकार गोव्यात घडू लागले आहेत. याचीच मोठी चिंता गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांनी व्यक्त केली आहे. गोव्यात पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाणाऱ्या होमस्टे व्यवस्थेतील गैरप्रकार स्थानिकांसाठीही सुरक्षेचा व चिंतेचा विषय ठरला आहे.
गोव्याच्या विधानसभेत मंगळवारी भाजपा आमदार मायकल लोबो यांनी यासंदर्भातला मुद्दा उपस्थित केला. मायकल लोबो हे गोव्यातील कलंगुट विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. या विधानसभा मतदारसंघातील काही निवासी संकुलांचं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं. त्याद्वारे त्यांनी मांडलेल्या मुद्द्यामुळे गोव्यातील स्थानिक रहिवाश्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आल्याची बाब गोवा विधानसभा अधिवेशनात अधोरेखित झाली. त्यावर गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांनी सविस्तर निवेदन सादर केलं.
गोव्यात पर्यटन व्यवसायाआडून गैरप्रकार?
गोव्यात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून दरवर्षी मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. त्यांची राहण्या-खाण्याची, फिरण्याची व्यवस्था गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांकडून केली जाते. मग ते हॉटेलिंग असो, वाहनांची व्यवस्था असो किंवा मग वेगवेगळ्या ठिकाणची प्रवेश फी असो. पण इतक्या मोठ्या संख्येनं येणाऱ्या पर्यटकांची व्यवस्था करण्यासाठी गोव्यातले हॉटेल आणि तिथले दर या गोष्टी सगळ्यांना परवडणारही नाहीत किंवा पुरणारही नाहीत. पण त्याचा दुसरा परिणाम म्हणजे गोव्याच्या निवासी संकुलांमध्ये वाढू लागलेलं पर्यटकांचं बेकायदा लॉजिंग!
गोवा विधानसभेत याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा पार पडली. गोव्यातल्या अनेक निवासी संकुलांमध्ये अनेक घरं ही कोणतीही परवानगी नसताना पर्यटकांना राहण्यासाठी दिली जातात, तिथे बेकायदेशीररीत्या व्यवसाय केला जातो. इथे राहणारे पर्यटक किंवा त्यांच्या पार्श्वभूमीची कोणतीही माहिती घेतली जात नाही. यामुळे त्या संकुलात राहणाऱ्या इतर रहिवाश्यांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा गोव्यात उपस्थित होऊ लागला आहे.
भाजपा आमदार लोबोंची चिंता
लोबो यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केली. “गोव्यातील विविध इमारतींमध्ये, नोंदणी न झालेल्या घरांमध्ये अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या होम-स्टेचा व्यवसाय चालू असणं ही गोवेकरांसाठी मोठी चिंतेची बाब ठरू लागली आहे. कोणतीही बंधनं नसलेले हे प्रकार नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहेत. जर एखाद्या इमारतीत ५० घरं असतील, तर त्यातली १० घरं पर्यटकांसाठी दिलेली असतात. तिथे कोण, कधी, कसं येतंय, कसं राहतंय, कधी जातंय याची कोणतीही माहिती ठेवली जात नाहीये. ते इमारतीच्या जागेत दारू पितात, मोठ्या आवाजात गाणी लावतात”, अशा तक्रारींचा पाढाच लोबो यांनी वाचून दाखवला.
दिल्लीतल्या काही नागरिकांनी गोव्यात दुसरं घर म्हणून काही घरांमध्ये गुंतवणूक केली आहे. हीच घरं पर्यटकांना बेकायदेशीररीत्या राहण्यासाठी दिली जात असून त्यातून नफा कमावला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
गोवा सरकारचा ‘प्लॅन ऑफ अॅक्शन’
दरम्यान, अशा बेकायदा होमस्टेवर कारवाई करण्यासाठी गोवा सरकारने प्लॅन ऑफ अॅक्शन तयार केला आहे. पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांनी ही माहिती दिली. “ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सीजकडे नोंद झालेल्या होमस्टेवर आमची बारीक नजर आहे. अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या सर्व व्यवस्थापनांनी सरकारकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण अडचण ही आहे की दिल्ली आणि इतर ठिकाणच्या काही लोकांनी कोविड काळात इथे घरं घेतली आहेत. पर्यटक येतात आणि त्या घरांमध्ये किंवा निवासी इमारतींमध्ये राहतात. अशा घरांबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. यामुळे सरकारचा महसूलही बुडत आहे”, असं खौंटे म्हणाले.
“जे कुणी अशा प्रकारची घरं घेऊन त्यांचा वापर पर्यटकांना निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी करतात, ते बहुतांश प्रकरणात त्याची नोंदणी करत नाहीत. या मुद्द्याकडे तातडीने लक्ष देणं आवश्यक आहे”, असं खौंटे यांनी नमूद केलं. गोव्याचे रहिवासी व पर्यटन क्षेत्र यांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी सरकार शाश्वत असा उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.