अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजीत बॅनर्जी यांची टीका

करोनाची पहिली लाट ओसरत होती तेव्हा करोना संपला असे अनेकांना वाटले. करोनाचे उच्चाटन होण्यास सुरुवात झाली आहे, असे विधान देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी मार्चच्या सुरूवातीस केले होते. एकूणच, करोना प्रादुर्भाव आणि त्याच्या परिणामाबाबत अंदाज बांधण्यास सरकार अपयशी ठरले, अशी  परखड टीका नोबेलविजेते प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजीत बॅनर्जी यांनी मंगळवारी केली.

बॅनर्जी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करोना, टाळेबंदी, पश्चिाम बंगालची निवडणूक आदी विषयांवर परखड भाष्य केले. केंद्र सरकारने लशींची आयात करून जनहितासाठी मोफत लसीकरणाची घोषणा करणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

टाळेबंदी तीन किंवा सहा महिने लागू करता येत नाही. अतिबाधित ठिकाणीच टाळेबंदी लागू करावी. तीन आठवड्यांची टाळेबंदी पुरेशी आहे, असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. टाळेबंदीचा आर्थिक दुर्बल घटकांना मोठा फटका बसतो. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात सरकारने गरीबांना अर्थसहाय्य करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

पश्चिाम बंगालमध्ये आठ टप्प्यांऐवजी एका टप्प्यात निवडणूक झाली असती तर बरे झाले असते. प्रचारसभांमुळे करोना नियमांचे उल्लंघन झाले, असे निरीक्षण बॅनर्जी यांनी नोंदवले. सत्ताधारी तृणमूल कॉंगे्रस हा भाजपपेक्षा अधिक स्वीकारार्ह असल्याचा कौल बंगली जनतेने दिला, असे बॅनर्जी म्हणाले. बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराची परंपरा जुनी आहे. कॉग्रेस, डावे आणि तृणमूल आदी पक्ष त्यास सारखेच जबाबदार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.