सध्या काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. आता केंद्र सरकार या दगडफेक करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची तयारी करत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. ते रविवारी ‘इंडिया टिव्ही’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी राजनाथ सिंह यांना काश्मीरमधील अनेक समस्यांविषयी प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा राजनाथ सिंह यांनी म्हटले की, आम्ही काश्मीरमध्ये सध्या जी काही पावले उचलत आहोत, त्यामुळे येथील अनेक समस्यांचा कायमचा निपात होईल. मला याबद्दल अधिक काही बोलायचे नाही आणि तसे करणे योग्यही ठरणार नाही. मात्र, काश्मीरची ओळख ही जपली गेली पाहिजे, असे राजनाथ यांनी म्हटले. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीर पोलीस आणि राज्य सरकारकडून दहशतवाद मोडून काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले. गेल्या काही काळात खोऱ्यामधील दगडफेकीच्या घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, सरकार एवढ्यावरच समाधानी नाही. दगडफेक ही पूर्णपणेच थांबली पाहिजे, हा सरकारचा आग्रह आहे. त्यासाठी काश्मीरी युवकांना रोजगार देण्यासारख्या पर्यायांचा विचार सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले.

‘काश्मीरमधील दहशतवादी जीव मुठीत घेऊन पळू लागले आहेत’

यावेळी त्यांनी काश्मीरी पंडितांच्या ‘घरवापसी’संदर्भातही भाष्य केले. दिवंगत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या काळात काश्मीरी पंडितांना परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्यांना पुनर्वसनासाठी संरक्षित क्षेत्रात जागाही देण्यात आली. तसेच त्यांच्याबरोबर इतर समाजाच्या लोकांचेही त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला. मात्र, नंतरच्या काळात परिस्थिती बदलली आणि खूपच वाईट होत गेली. त्यामुळे काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया लांबणीवर पडली. सहा महिन्यांत किंवा एका वर्षात हे घडेलच, असे मी निश्चितपणे सांगू शकत नाही. मात्र, ही घाईघाईत उरकरण्याची गोष्ट नाही, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

ना गोळीची भीती…, ना स्फोटाची फिकीर; आता दहशतवाद्यांशी लढणार लष्कराचे ‘रोबोट्स’