खर्चातील कपात सुसहय़ करणाऱ्या द्विपक्षीय कराराच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अर्थसंकल्प विधेयकावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वाक्षरी केली आहे. ग्वाटानामो येथील छळछावणी म्हणून कुप्रसिद्ध असलेला तुरुंगही बंद करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्राधिकार विधेयकावरही त्यांनी स्वाक्षरी केली.
क्युबातील ग्वाटानामो येथे नौदलाच्या तळावर असलेल्या तुरुंगातील कैद्यांना परत पाठवण्याच्या प्रक्रियेला वेग देणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी करताना हे स्वागतार्ह पाऊल असल्याचे ओबामा यांनी सांगितले. विशेष म्हणजे लष्करातील लैंगिक छळवणुकीलाही यामुळे लगाम बसणार आहे. ओबामा यांनी या दोन्ही विधेयकांवर हवाई बेटांवर नाताळच्या सुटीवर असताना स्वाक्षरी केली असून, ग्वाटानामो येथील छळछावणी असलेला तुरुंग बंद करण्यात यावा, असे ओबामा यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून अनेकदा म्हटले होते. ग्वाटानामो येथील कैद्यांना परदेशांच्या ताब्यात देऊन ही स्थानबद्धतेची सुविधा बंद करण्यासाठी आपण अमेरिकी काँग्रेससमवेत काम करू असे त्यांनी म्हटले आहे. ग्वाटानामो तुरुंग चालू ठेवल्याने एकतर राष्ट्रीय सुरक्षेवर मोठा आर्थिक ताण येत आहे व त्याचबरोबर मित्र देश व भागीदार देशांसमवेत संबंधात कटुता येत आहे. अफगाणिस्तानातील तळांच्या संरक्षणखर्चासाठी ५२७ अब्ज व तेथील युद्धासाठी ८० अब्ज अमेरिकी डॉलर खर्चाची तरतूदही या विधेयकात आहे. लष्करात लैंगिक छळवणूक करणाऱ्यांसाठी शिक्षेचाही प्रस्ताव त्यात आहे. ओबामा यांनी अमेरिकी काँग्रेसचे पॉल रायन व सिनेटर पॅटी मरे यांनी तयार केलेल्या द्विपक्षीय विधेयकावरही स्वाक्षरी केली असून, त्यामुळे २०१४ व २०१५ या दोन वर्षांत १ ट्रिलियन खर्चास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे कर वाढवण्याची तसेच खर्च कपात करण्याची वेळ येणार नाही. दोन्ही पक्ष एकत्र काम करू शकतात याचेच हे उदाहरण आहे असे रायन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2013 रोजी प्रकाशित
ग्वाटानामो येथील कैद्यांची छळछावणी बंद होणार
खर्चातील कपात सुसहय़ करणाऱ्या द्विपक्षीय कराराच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अर्थसंकल्प विधेयकावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी
First published on: 28-12-2013 at 03:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guantanamo bay detention camp set to shut down