काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या चर्चांचा समाचार घेताना आझाद यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. “मोदी हा केवळ बहाणा आहे. जी-२३ सदस्यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिल्यापासून त्यांना माझ्यासोबत समस्या आहेत. कोणीही त्यांच्या विरोधात लिहावं किंवा प्रश्न विचारावेत, असं त्यांना नको असतं” असे आझाद म्हणाले आहेत. दरम्यान, घर सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप देखील आझाद यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केला आहे.

Ghulam Nabi Azad Resignation: “गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील”

“राजीनामा देण्याआधी सहा दिवस झोपलो नाही. या पक्षासाठी आम्ही रक्त सांडवलं आहे. काँग्रेस पक्षात सध्या अकार्यक्षम लोक आहेत. काँग्रेसमधील प्रवक्त्यांना आमच्या विषयी माहित नसणं, अत्यंत वेदनादायी आहे” अशी प्रतिक्रिया आझाद यांनी दिली आहे. काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षात अनेक बैठका होत होत्या. मात्र, या बैठकांमध्ये माझा एकही सल्ला घेण्यात येत नव्हता अशी नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या ३० वर्षांपासून सोनिया गांधीविषयी असलेला आदर अजुनही कायम आहे. इंदिरा गांधींचा नातू, सोनिया आणि राजीव गांधींचा पुत्र म्हणून राहुल यांचाही मी आदर करतो. त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, अशी मी प्रार्थना करतो. त्यांना एक यशस्वी नेता बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण त्यात त्यांनाच रस नव्हता” असे आझाद म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर गुलाम नबी आझाद नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. येत्या १४ दिवसांमध्ये पक्षाच्या स्थापनेची घोषणा होईल, अशी माहिती जम्मू काश्मीरचे माजी मंत्री ताज मोहीउद्दीन यांनी दिली आहे. मोहीउद्दीन यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वातील नवा पक्ष ‘जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स’(JKNC) आणि ‘द पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’ (PDP) यांच्या पक्षासोबत युती करणार असल्याचे संकेत मोहीउद्दीन यांनी दिले आहेत.