गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नाहीतर संपूर्ण जगाला घाबरवून टाकणाऱ्या करोना महामारीच्या दहशतीचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. तसं पाहीलं तर करोना महामारीची भीती आता लोकांच्या मनातून कमी झाली आहे असं दिसून येतं. मात्र गुरुग्राममधील एक महिला याला अपवाद म्हणात येईल. या महिलेने करोनाची एवढी धास्ती घेतली की करोना संसर्ग होऊ नये म्हणून तिने स्वत:ला आणि आपल्या दहा वर्षीय मुलाला जवळपास तीन वर्षे घरात कोंडून घेतलं होतं. हा धक्कादायक प्रकार गुरुग्राम येथील मारुती कुंज भागात उघडकीस आला.

महिलेचे नाव मुनमुन मांझी असून तिच्या दहा वर्षीय मुलाला पोलिसांनी आरोग्य व बाल कल्याण विकास अधिकाऱ्यांच्या एक पथकाने सोडवलं होतं. आई व मुलाला गुरुग्राम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अशी माहिती समोर आली आहे की, ही महिला करोनामुळे खूपच घाबरली होती आणि जेव्हा २०२० मध्ये पहिल्यांदा लॉकडाउननंतर निर्बंध शिथिल करण्यात आले, तेव्हा या महिलेचा पती सुजान मांझी कामासाठी घराबाहेर पडला होता, मात्र तेव्हापासून या महिलेने आपल्या पतीलाही घरात प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे या महिलेच्या पतीने काही काळ आफल्या नातेवाईक, मित्रांकडे राहून काढला, मात्र आपल्या कुटंबाच्या संपर्कात राहण्याचे सुजान मांझी यांनी त्याच भागात आणखी घर भाडेतत्त्वार घेतले होते. व्हिडीओ कॉलद्वारे ते आपल्या पत्नी आणि मुलाच्या संपर्कात राहत होते आणि त्या दोघांच्या सर्व गरजा भागवत होते.

या काळात सुजान मांझी यांनी घर भाडे, मुलाच्या शाळेचे शुल्कही नियमित भरले. पत्नी व मुलासाठी किराणा सामान, भाजी इत्यादी वस्तू दरवाज्या बाहेर ठेवून जात असे. एवढच काय तर गॅस सिलिंडर संपल्यानंतर त्या महिलेने गॅस शेगडी वापरणंही बंद केलं होतं. इंडक्शनचा वापर करून ती महिला जेवण बनवत होती. तर तिचा मुलगा ऑनलाइन शिक्षण घेत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुजान यांनी आपल्या पत्नीची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यांनी आपल्या सासुरवाडीच्या मंडळींनाही पत्नीची समजूत काढण्यास सांगितले होते. परंतु मनुमुन आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्या आपल्या मुलाला तोपर्यंत सोडणार नव्हत्या, जोपर्यंत त्यांच्या मुलासाठी करोना लस येत नाही. आतापर्यंत १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोणतीही लस नव्हती, तर त्यांचा मुलगा दहा वर्षांचा आहे. यानंतर सुजान यांनी पोलिसांशी संपर्क साधला, यानंतर पोलीस आणि आरोग्य विभाग व बाल कल्याण विभागाचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले आणि त्यांना आई व मुलाला घराबाहेर काढले.