मुंबई विमानतळाची मालकी अदाणी समूहाला देण्यासाठी मोदी सरकारने जीवीके कंपनीवर दबाव आणला, असा आरोप राहुल गांधी यांनी काल संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना केला होता. दरम्यान, राहुल गांधींच्या या आरोपावर जीवीके कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यासंदर्भात एनडीटीव्हीशी बोलताना कंपनीचे उपाध्यक्ष संजीव रेड्डी यांनी हे आरोप फेटाळून लावले.
हेही वाचा – ‘अदानी’वरून संसदेत वादंग, मोदींमुळे अदानींचा साम्राज्यविस्तार
काय म्हणाले संजीव रेड्डी?
“अदाणी समूहाबरोबर झालेल्या हस्तांतरणाची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. हे हस्तांतरण होण्यापूर्वी आम्ही बंगळुरू विमानतळाचे अधिग्रहण केले होते. त्यामुळे आमच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. त्यानंतर करोनाचे संकट आले आणि तीन महिने मुंबई विमानतळ बंद होते. आमचे उत्पन्न ठप्प झाले होते. आम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. आमच्यावर कर्जही होते. त्यामुळेच आम्ही अदाणी समूहाबरोबर करार केला. राहुल गांधींच्या आरोपाबाबत बोलायचं झाल्यास, त्यावेळी आमच्यावर कोणताही दबाव नव्हता”, अशी प्रतिक्रिया संजीव रेड्डी यांनी दिली.
हेही वाचा – संजय राऊतांकडून पुन्हा एकदा राहुल गांधींची स्तुती; म्हणाले “राहुल गांधी यांनी आज लोकसभेत…”
राहुल गांधींनी नेमके काय आरोप केले?
मंगळवारी संसदेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. “पंतप्रधान मोदी यांनी नियम बदलवून कोणताही अनुभव नसणाऱ्या अदाणी समुहाला देशातील सहा विमानतळांची मालकी दिली”, असं ते म्हणाले. तसेच “मोदी सरकारने नियम बदलल्यानंतर भारतातील सर्वात महत्त्वाचे असलेले मुंबई विमानतळ जीवीके कंपनीकडून घेऊन अडाणींना दिले. यासाठी मोदी सरकारने ईडी, सीबीआय सारख्या तपास संस्थांचा वापर करत जीवीके कंपनीवर दबाव आणला”, असा आरोपही त्यांनी केला.