सौदी अरेबियामध्ये एका भारतीय महिलेच्या हाताचे तुकडे केल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, कोणत्याही स्थितीत ते स्वीकारार्ह नाही, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. काम करीत असलेल्या ठिकाणीच्या मालकाने ५५ वर्षांच्या कस्तुरी मुनिरथीनाम या महिलेच्या हाताचे तुकडे केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे.
याबद्दल सुषमा स्वराज म्हणाल्या, ज्या पद्धतीने हाताचे तुकडे करण्यात आले आहेत. ते अत्यंत गंभीर आणि आम्हाला अस्वस्थ करणारे आहे. कोणत्याही स्थितीत ही कृती स्वीकारण्याजोगी नाही. सौदी अरेबिया सरकारच्या अधिकाऱ्यांसमोर आम्ही हा विषय उपस्थित केला आहे. या प्रकरणी आरोपीविरूद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
सौदी अरेबियातील भारतीय दूतावासातील अधिकारी पीडित महिलेच्या संपर्कात असून, तिला आवश्यक उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.