पीटीआय, नवी दिल्ली : करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम संथ झाली आहे. देशभरात तिला चांगलीच गती देण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्राने सर्व राज्यांना जूनपासून ‘हर घर दस्तक- मोहीम २’ दोन महिने राबवण्याची सूचना केली आहे. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आवाहन केले आहे, की देशभरात संपूर्ण लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी  मोहिमेची गती वाढवण्याची गरज आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसह झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही सूचना केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे दिली.

पत्रकात नमूद केले आहे, की  ‘हर घर दस्तक’ योजनेचा दुसरा टप्पा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी राबवावा. येत्या जून व जुलैत सर्व जिल्हे, गाव पातळीवर सर्वत्र ही योजना अंमलात आणावी. या योजनेंतर्गत पहिली, दुसरी किंवा प्रतिबंधक तिसरी लसीकरण मात्रा देण्यासाठी  घरोघरी जाऊन पोहोचायचे आहे.  ज्येष्ठ नागरिक संकुल, शाळा आणि महाविद्यालये, शालाबाह्य मुले (१२ ते १८ वर्षे वयोगट), कारागृहे, वीटभट्टय़ा आदी ठिकाणी लसीकरणाचा हा टप्पा राबवायचा आहे.

साठ वर्षे व त्यावरील वयोगटासाठीची तिसरी मात्रा,  १२ ते १४ वर्षे वयोगटासाठीची लसीकरण मोहीम थंडावल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी राहिलेल्या लसीकरण लाभार्थीची यादी सूक्ष्म नियोजन करून बनवावी. सुस्पष्ट आणि परिणामकारक संवादाचे धोरण अवलंबावे, अशी सूचनाही पत्रकात  केली आहे.

‘मुदत संपत आलेली लस आधी वापरा!’

कोविड लस कुठल्याही स्थितीत वाया जाऊ न देण्याची आग्रही सूचना केंद्रातर्फे करण्यात आली आहे. यासाठी सातत्याने लशींच्या विनियोगावर लक्ष ठेवावे. मुदत संपणाऱ्या लशी सर्वप्रथम वापरण्याचे धोरण ठेवावे. म्हणजेच ज्या लशींची मुदत संपण्याची तारीख जवळ आली आहे, ती लस मुदत संपण्याआधी सर्वप्रथम वापरावी, अशा सूचना यावेळी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिल्याचे पत्रकात नमूद केले आहे.