भोंदू गोरक्षकांच्या कारवायांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परखड टीका केल्यानंतर हरयाणा सरकारने खरे गोररक्षक शोधून काढण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. हरयाणा भाजपचे प्रवक्ते रमण मलिक यांनी सांगितले, की हरयाणा सरकारने भारती अरोरा यांची नेमणूक केली असून, त्यांच्या नेतृत्वाखालील पथक खरे गोरक्षक कोण आहेत ते शोधून काढेल. त्यांनी म्हटले आहे, की एकूण गोरक्षक दलाच्या ३२५ सदस्यांची यादी आहे. आता पोलीसच खरे गोरक्षक कोण व त्या नावाखाली गैरकृत्ये करणारे कोण यांचा शोध घेतील. गोरक्षण हा मोठा विषय आहे व त्याला नैतिक व सामाजिक जबाबदारीचे अंग आहे. गायींची तस्करी किंवा कत्तल होऊ नये ही आपली जबाबदारी आहे. हरयाणा विधानसभेने गोवंश संरक्षण व गोसंवर्धन विधेयक २०१५ मंजूर केले आहे, त्यानुसार नियमांचा भंग करणाऱ्यांना १० वर्षे कैद व एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे. मोदी यांनी भोंदू गोरक्षकांवर टीका करताना असे म्हटले होते, की काही समाजकंटकांनी त्यांची गैरकृत्ये झाकण्यासाठी स्वत:ला गोरक्षक जाहीर केले आहे.