पीटीआय, श्रीनगर : मुसळधार पावसामुळे जम्मूच्या विविध भागांतील परिस्थिती खूपच गंभीर आहे. प्रशासनाला उच्च सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी सांगितले. जम्मूतील पुरात आतापर्यंत तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून, मुसळधार पावसामुळे सुमारे दोन डझन घरे आणि पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व नद्या धोकादायक पातळीवर वाहत आहेत, ज्यामुळे शहर आणि इतरत्र अनेक सखल भाग व रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
जम्मू विभागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अब्दुल्ला यांनी आपत्कालीन बैठकीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’वरील संदेशात जम्मूच्या अनेक भागांतील पूरस्थिती खूपच गंभीर असल्याचे म्हटले आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयाने ‘एक्स’ संदेशात म्हटले की, पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे आणि सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. बैठकीत जम्मूचे विभागीय आयुक्त आणि सर्व १० जिल्ह्यांच्या उपायुक्तांनी अब्दुल्ला यांना प्रत्यक्ष परिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांच्या तयारीबद्दल माहिती दिली.
मुसळधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर आणि किश्तवाड-दोडा राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक स्थगित करण्यात आली होती, तर डझनभर डोंगराळ भागातील रस्ते भूस्खलन किंवा अचानक आलेल्या पुरामुळे बंद झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी प्रशासनाला पीडित कुटुंबांना अन्न, स्वच्छ पिण्याचे पाणी, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू वेळेवर पुरवण्याचे निर्देश दिले. तसेच लोकांना प्राधान्याने मदत मिळाली पाहिजे, असेही अधिकाऱ्यांना सांगितले.