काही दिवसांपूर्वी हिंडेनबर्ग रीसर्चनं भारतातील अदाणी उद्योगसमूहासंदर्भात जारी केलेल्या अहवालामुळे देशात मोठी खळबळ उडाली. विशेषत: शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ झाली. अदाणी समूहातील कंपन्यांचे शेअर्स वेगाने जमिनीवर कोसळले. देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदाणींची गच्छंती झाली. तर अनेक आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातून अदाणी समूहाला ‘डीलिस्ट’ करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर हिंडेनबर्गच्या त्या अहवालाचे पडसाद अजूनही भारतीय बाजारपेठेत आणि राजकीय वर्तुळात जाणवत असताना आता पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट करण्यासाठी हिंडेनबर्ग सज्ज झालं आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री दीडच्या सुमारास हिंडेनबर्ग रीसर्चच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये संस्थेनं अजून एक अहवाल जाहीर करण्याची तयारी चालवली असल्याचं सांगण्यात आलं आहे. “नवीन अहवाल लवकरच..अजून एक मोठा खुलासा”, असं या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता हिंडेनबर्ग कुणाचा आणि विशेषत: कुठल्या देशातल्या गैरव्यवहारांचा खुलासा करणार? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

“आशा आहे की ही भारतीय कंपनी नसेल!”

दरम्यान, हिंडेनबर्गच्या या अहवालावर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी “आशा आहे की यावेळी आणखीन एक भारतीय कंपनी नसावी. यावेळी बदल म्हणून एखादी चायनिज कंपनी बघा”, असा सल्ला हिंडेनबर्गला दिला आहे. तर काहींनी “ही एक अमेरिकन कंपनी असेल, जिचा प्रमुख भारतीय असेल”, असा अंदाजही वर्तवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे झालेल्या नुकसानातून अजूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न अदाणी समूह आणि गौतम अदाणी करत असताना राजकीय वर्तुळात विरोधकांनी अदाणींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करत सत्ताधारी भाजपाला सातत्याने लक्ष्य केलं आहे.