वाराणसी जिल्हा न्यायालयात १८ डिसेंबर रोजी सीलबंद लिफाफ्यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने केलेला अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालातील निष्कर्षांचा अभ्यास दोन्ही पक्षकारांना करण्याची संधी मिळेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या अहवालातील काही महत्त्वाच्या मुद्दयांची माहिती दिली. ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर पूर्वी एक मोठे हिंदू मंदिर अस्तित्त्वात होते, असे अहवालात नमूद असल्याचा दावा जैन यांनी पत्रकार परिषदेत केला.

.

ज्ञानवापी मशीद : वैज्ञानिक सर्वेक्षण नेमके काय आहे?

पत्रकार परिषदेत वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, महामुक्ती मंडप असा शब्द लिहिलेला एक शिलालेख मशिदीच्या आवारात सापडला आहे. हा अतिशय महत्त्वाच शब्द असल्याचे पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. सर्वेक्षणाच्या दरम्यान शिलालेखाच्या दगडाचे तुकडे मिळाले आहेत. या शिलालेखाचे इतर तुकडे पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आधीपासूनच आहेत, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

तसेच मशिदीच्या तळघरात हिंदू देवदेवतांच्या मूर्ती पुरल्या गेल्या होत्या. त्या मूर्ती पुरातत्त्व विभागाला मिळाल्या असल्याचा दावा वकील विष्णू शंकर जैन यांनी केला आहे. तसेच मशिदीची पश्चिम दिशेची भिंत ही हिंदू मंदिराची असल्याचेही या अहवालात म्हटले गेले आहे. हिंदू मंदिराचा ढाचा १७ व्या शतकात पाडला गेला असून त्याच ढाचाचा आधार घेऊन वर्तमान ढाचा उभारला गेला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याचेही वकील जैन यांनी सांगितले.

“ज्ञानवापी मंदिर की मशीद? या मुद्द्याला राष्ट्रीय महत्त्व”, अलाहाबाद कोर्टाने मुस्लिम समाजाच्या पाचही याचिका फेटाळल्या

पुरातत्त्व विभागाने एकूण ८३९ पानांचा अहवाल सादर केलेला आहे. यापुढे आता वजुखान्याच्या भागाचेही सर्वेक्षण करावे, अशी मागणी घेऊन पुन्हा न्यायालयासमोर जाणार असल्याचे जैन यांनी सांगितले.

ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण नेमके कुठे?

ज्ञानवापी मशिदीची मुख्यत्वे पश्चिम भिंत आणि तीन घुमटांचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय वाराणसी न्यायालयाने दिला होता. मशिदीच्या संकुलातील सर्व तळघरांखालील भूभागाचीही तपासणी करून या बांधकामाचे स्वरूप आणि त्याचा कालखंड तपासण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. या मशिदीतील सर्व कलावस्तूंची गणना होणार असून, त्यांचा कालखंड निश्चित करण्याबरोबरच मशिदीचे जोते (प्लिंथ) आणि खांबांचेही कालमापन करावे, असे न्यायालयाने म्हटले होते.

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी प्रकरणातील ASI च्या अहवालाबाबत वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय

ज्ञानवापी प्रकरण काय आहे?

ज्ञानवापी मशीद परिसरात पूजाअर्चा करू देण्याची विनंती वाराणीसीतील काही साधूंनी १९९१ मध्ये न्यायालयाकडे केली होती. हिंदू मंदिराचा काही भाग उद्ध्वस्त करून ही मशीद बांधण्यात आल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. अलिकडे पाच हिंदू महिलांनी ज्ञानवापी मशीद संकुलात शृंगारगौरीसह अन्य देवतांच्या पूजनासाठी परवानगी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने या संकुलाच्या तळमजल्यांचे सर्वेक्षण आणि चित्रीकरणासाठी समिती नेमली. या सर्वेक्षणाला मशीद व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतला. तिथे सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केला, तर तो वजुखान्याचा भाग असल्याचा मुस्लिम याचिकाकर्त्यांचा दावा आहे. मात्र, ‘शिवलिंग’ परिसरात वैज्ञानिक सर्वेक्षण करून कालमापन करण्याची आवश्यकता हिंदू याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली.