Houthis Warn US Against Entering Iran-Israel War: येमेनमधील हुथी बंडखोरांनी शनिवारी (२१ जून) अमेरिकेला इस्रायल-इराण संघर्षात भाग न घेण्याची धमकी दिली आहे. एका व्हिडिओ निवेदनात, हुथींनी म्हटले आहे की, जर अमेरिकेने इस्रायलच्या इराणविरुद्धच्या संघर्षात भाग घेतला, तर ते लाल समुद्रात अमेरिकी जहाजांवर हल्ला करतील.

“जर अमेरिका इस्रायलसोबत इराणविरुद्ध हल्ला केला, तर सशस्त्र दल (हुथी) लाल समुद्रात अमेरिकेच्या जहाजांना आणि युद्धनौकांना लक्ष्य करतील,” असे या गटाचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी एका व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे. १३ जून रोजी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर ‘अ‍ॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स’च्या एखाद्या सदस्याने केलेले हे पहिलेच विधान आहे.

‘अ‍ॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स’

अनेक दशकांपासून इराणने इस्रायल आणि अमेरिकेचा द्वेष करणाऱ्या नागरिक सैन्याचे जाळे उभारले आहे. याला ‘अ‍ॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ असे म्हटले जाते. परंतु इस्रायलशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अ‍ॅक्सिस ऑफ रेझिस्टन्सने मौन बाळगल्याने या प्रदेशातील त्यांच्या अस्तित्वाबद्दल आणि त्यांच्या सामर्थ्याबद्दल मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. इराणच्या नेतृत्वाखाली अ‍ॅक्सिस ऑफ रेझिस्टन्समध्ये सध्या सत्तेत नसलेली सीरियाची असद राजवट, लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाह, विविध इराकी शिया नागरिक सैन्य, येमेनी हुथी, हमास आणि इस्लामिक जिहाद सारख्या पॅलेस्टिनी गटांचा समावेश आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराण-इस्रायल संघर्षात थेट लष्करी सहभाग घेण्याचा विचार करत आहेत, परंतु त्यांनी त्यांचा निर्णय दोन आठवड्यांपर्यंत पुढे ढकलला आहे. यासाठी त्यांनी इराणला “बिनशर्त आत्मसमर्पण” करण्याचे आवाहन केले आहे.

यावर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इशारा दिला की, अशी कारवाई “प्रत्येकासाठी खूप धोकादायक” असेल.

इराण-इस्रायल संघर्षाची सुरूवात

१३ जून रोजी इस्रायलने इराणचे अणु प्रकल्प, लष्करी तळ, वरिष्ठ कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांवर हवाई हल्ले सुरू केल्यानंतर हा संघर्ष सुरू झाला आहे. वॉशिंग्टनस्थित इराणी मानवाधिकार संघटनेच्या मते, या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत किमान ७२२ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २८५ नागरिक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायली लष्कराच्या अंदाजानुसार, इराणने इस्रायलवर ४५० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि सुमारे १,००० ड्रोन डागले आहेत. इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालींनी बहुतेक हल्ले रोखले असले, तरी इस्रायलचे किमान २४ नागरिक मारले गेले असून, शेकडो नागरिक जखमी झाले आहेत.