Reddit Post Of Bengaluru Engineer On Salary Growth: बंगळुरूमधील ३५ वर्षीय वेब डेव्हलपरने संघर्षातून समृद्धीकडे केलेल्या प्रवासाचे सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. रेडिटवरील इंडियन फ्लेक्स कम्युनिटीत त्याने शेअर केलेली निनावी पोस्ट त्याच्या प्रेरणादायक करिअरमुळे प्रचंड व्हायरल होत आहे. महिन्याला फक्त ५,००० रुपये कमावत आपल्या करिअरची सुरुवात करणारा हा तरुण चिकाटीच्या जोरावर आज तंत्रज्ञान क्षेत्रात ४६ लाख रुपयांचा वार्षिक पगार मिळवत आहे. याबाबत त्याने या पोस्टमध्ये माहिती दिली आहे.
त्यांचे सुरुवातीचे जीवन खूप हालाखीत गेले. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाचे पालक शेतमजूर म्हणून काम करायचे. त्याचे बालपण खूप कठीण परिस्थितीत गेले. जेव्हा तो सात वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या पालकांना त्याला आणि त्याच्या मोठ्या भावाला त्यांचे मूळ गाव सोडून चांगल्या नोकरीच्या शोधात बंगळुरूला स्थलांतरित होण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला.
बंगळुरूला स्थलांतरित झाल्यानंतर त्याच्या आईने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक ठिकाणी विविध प्रकारची कामे केली. ती दिवसा अनेक घरांमध्ये घरकाम करायची आणि संध्याकाळी एका कापडाच्या कारखान्यात शिलाईचे काम करायची.
दरम्यान, गावात त्याच्या आजीने त्याच्या मुख्य पालकाची जबाबदारी उचलली. मर्यादित साधनसंपत्ती असूनही, तिने दोन्ही भावांना शिस्तीने आणि अत्यंत मायेने वाढवले. तिच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सरकारी शाळांमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा त्यांच्या स्वप्नांमध्ये अडथळा येऊ दिला नाही.
दहावी पूर्ण केल्यानंतर, या तरुणाने सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याला हे कॉलेज पसंत नव्हते, तरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हे कॉलेज स्वीकारले कारण तेथे त्याला मोफत वसतिगृहाची सुविधा मिळाली होती.
या संधीचा पुरेपूर फायदा घेत त्याने शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी केली आणि सर्वोत्तम विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. हा काळ त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला, ज्याने त्याला शिस्त, सातत्य आणि चिकाटीचे महत्त्व शिकवले.
नंतर, त्याने अभियांत्रिकीमध्ये बी.टेक पदवी मिळवली. हे त्याच्या मोठ्या भावाच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले, जो पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करायचा. त्याच्या भावाच्या प्रोत्साहनाने आणि आर्थिक मदतीने त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केले.
पदवी मिळवल्यानंतर, त्याने कनिष्ठ वेब डेव्हलपर म्हणून कामाला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला केवळ ५,००० रुपये मासिक पगार होता. पगार जरी कमी असला तरी, कोडिंग आणि वेब डेव्हलपमेंटची त्याची आवड त्याला विविध गोष्टी करण्याची प्रेरणा देत राहिली. त्याने सतत आपल्या कौशल्यामध्ये सुधारणा केली आणि त्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड दिले.
टेक उद्योगात एका दशकाहून अधिक काळ, तो हळूहळू करिअरची शिडी चढत गेला. अखेर त्याच्या समर्पणाचे फळ मिळाले आणि आता तो दरवर्षी ४६ लाख रुपये कमावतो. हा आकडा केवळ आर्थिक यशाचेच नव्हे तर धैर्य, त्याग आणि अथक प्रयत्नांच्या प्रवासाचे प्रतीक आहे.
करिअरसोबतच, त्याच्या कुटुंबाची जीवनशैलीही सुधारली आहे. आता त्यांच्याकडे पाच एकर जमीन आहे, त्यांनी घर बांधले आहे आणि एक कार खरेदी केली आहे.