John Abraham Letter To CJI B. R. Gavai On Stray Dogs: सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट रोजी दिल्ली-एनसीआरमधून सर्व भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे आदेश दिले होते. कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना आणि रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंची चिंताजनक संख्या लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना प्राणी निवारा केंद्रात ठेवण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये नाराजीचा सूर उमठला आहे. जॉन अब्राहम, जान्हवी कपूर, वरुण धवन आणि वीर दास यांनी या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे.
जॉन अब्राहमने भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांना तातडीने एक पत्र लिहून दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना प्राणी निवारा केंद्रांत पाठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आढावा घेण्याची विनंती केली आहे.
मला आशा आहे की, तुम्हीही…
भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना लिहिलेल्या पत्रात जॉन अब्राहमने लिहिले आहे की, “माननीय न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि माननीय न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या एका निकालात दिल्लीतील सर्व भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवरून हटवून प्राणी निवारा केंद्रांमध्ये किंवा दुर्गम भागात पाठवण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे. मला आशा आहे की, तुम्हीही याच्याशी सहमत व्हाल की हे ‘भटके’ कुत्रे नाहीत. अनेक लोक त्यांचा आदर करतात आणि त्यांच्यावर प्रेमही करतात. ते येथेच पिढ्यान्पिढ्या माणसांच्या शेजारी राहिलेले, दिल्लीकरच आहेत.”
जॉनने पत्रात पुढे असे लिहिले आहे की, “अनेक दशकांपासून प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणारा व्यक्ती म्हणून, मी आदरपूर्वक हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, हे निर्देश प्राणी जन्म नियंत्रण नियम, २०२३, पूर्वी प्राणी जन्म नियंत्रण (कुत्रे) नियम, २००१ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या मुद्द्यावरील पूर्वीच्या निकालांशी थेट विरोधाभास आहे. प्राणी जन्म नियंत्रण कायद्यातील नियमांनुसार कुत्र्यांचे विस्थापन करण्यास मनाई आहे. त्याऐवजी त्यांची नसबंदी आणि लसीकरण करणे असे पर्याय आहेत.”
जान्हवी, वरुणने व्यक्त केली नाराजी
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता वरुण धवन यांनीही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे. जान्हवीने लिहिले की, “ते याला धोका म्हणतात. आपण त्याला हृदयाचे ठोके म्हणतो.”