Tahawwur Rana : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात आणण्यात आलं आहे. अमेरिकेकडून तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणाच्या पथकांनी अमेरिकेत जाऊन तहव्वूर राणाला भारतात आणलं. सध्या तहव्वूर राणाला कोठडीत असून त्याची राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याबाबत चौकशी करण्यात येत आहे.
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याबाबत तहव्वूर राणाने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक तहव्वूर राणा आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील त्याने त्याच्या भूमिकेबाबत कबुली दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. “मी पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होतो”, अशी कबुली तहव्वूर राणाने दिल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलं आहे.
वृत्तानुसार, दिल्लीतील तिहार तुरुंगात एनआयएच्या ताब्यात असलेल्या तहव्वूर राणाने तपास यंत्रणांना चौकशीदरम्यान अनेक खुलासे केले असल्याचं सांगितलं जात आहे. तहव्वूर राणाने असंही सांगितलं की, “तो आणि त्याचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडलीने पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाबरोबर अनेक प्रशिक्षण सत्रे घेतली होती. तसेच लष्कर-ए-तोयबा प्रामुख्याने गुप्तहेर नेटवर्क म्हणून काम करतं.” वृत्तानुसार, मुंबईत त्याच्या फर्मचं इमिग्रेशन सेंटर उघडण्याची कल्पना देखील त्याचीच होती आणि २६/११ च्या हल्ल्यादरम्यान तो दहशतवाद्यांच्या योजनेचा एक भाग होता, असंही त्याने कबूल केल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
तहव्वूर राणा कोण?
तहव्वूर राणा हा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित आहे. त्याला दाऊद गिलानी म्हणूनही ओळखले जातं. तो या हल्ल्यांमधील एक प्रमुख व्यक्ती होता. त्याच्यावर हेडली आणि पाकिस्तानमधील इतरांना मुंबई दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. पण, राणाचा असा दावा आहे की त्याला हेडलीच्या दहशतवादी कटाची माहिती नव्हती आणि तो फक्त त्याचा बालपणीचा मित्र हेडलीला मदत करण्याचा आणि मुंबईत व्यवसाय कार्यालय स्थापन करण्याचा प्रयत्न करत होता.
डेव्हिड कोलमन हेडली कोण आहे?
डेव्हिड कोलमन हेडलीचा जन्म वॉशिंग्टन डीसीमध्ये झाला. दाऊद सय्यद गिलानी हे त्याचं जन्मनाव होतं. त्याचा जन्म एक प्रसिद्ध पाकिस्तानी राजनयिक आणि प्रसारक सय्यद सलीम गिलानी आणि त्याची अमेरिकन पत्नी अॅलिस सेरिल हेडली यांच्या पोटी झाला. अमेरिकेत कायमचे स्थलांतरीत होण्यापूर्वी हेडलीने आपलं सुरुवातीचं वर्ष जीवन पाकिस्तानातील एका बोर्डिंग स्कूलमध्ये घालवलं. अमेरिकेत गेल्यानंतर त्याने फिलाडेल्फिया येथील त्याच्या कुटुंबाच्या पबमध्ये बारमन म्हणून काम केलं.
२६/११ हल्ल्यातील सहभाग
डेव्हिड कोलमन हेडली २००२ ते २००५ दरम्यान पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या किमान पाच प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर, हेडली लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर्सच्या सूचनेनुसार भारतात पाळत करण्यासाठी आला होता. २००८ मध्ये मुंबई हल्ल्यांपूर्वी तो पाच वेळा भारतात आला होता, अशी माहिती अमेरिकेच्या न्याय विभागाने दिली होती.