आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यावर आरोप केले. गौतम गंभीर यांनी माझ्याविरोधात बदनामीकारक पत्रकं वाटली असा आरोप आतिशी मार्लेना यांनी केला. यावर आता गौतम गंभीरने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांना टॅग करत गौतम गंभीरने एक ट्विट केला आहे की तुम्ही करत असलेले आरोप खरे ठरले तर मी गळफास घेईन.

गौतम गंभीरने आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. मी आतिशी मार्लेना यांच्याविरोधात कोणतीही पत्रकं वाटलेली नाहीत. माझ्यावर उगाचच आरोप करण्यात येत आहेत. तसेच माझी प्रतिमा मलीन करण्यात येते आहे असेही गौतम गंभीरने म्हटले आहे.

आतिशी मार्लेना यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन गौतम गंभीर यांच्यावर आरोप केले आहेत. माझ्याविरोधात बदनामी करणारा मजकूर असलेली पत्रकं गौतम गंभीर यांच्या कार्यकर्त्यांनी वाटल्याचा आरोप मार्लेना यांनी केला. तसंच गौतम गंभीर यांचे स्त्रियांबाबतचे विचार इतके हीन असतील असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. त्यानंतर दिल्ली महिला आयोगाकडे आतिशी मार्लेना यांनी केली आहे. यानंतर गंभीर यांनी माझ्यावर करण्यात आलेले आरोप खरे ठरल्यास जनतेसमोर येऊन गळफास घेईन असं म्हटलं आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि हरभजन सिंग या दोघांनीही गौतम गंभीरला पाठिंबा दिला आहे.