शियांनी राम मंदिराला पाठिंबा दिला आहे. सुन्नींनीही समर्थन द्यायला हवे. प्रत्येक भारतीय रामाचा वंशज आहेत, असे सांगत हिंदू आणि मुस्लिम राम मंदिर बांधण्यासाठी एकत्र येतील. भारतात राम मंदिर बांधायचे नाही तर मग काय पाकिस्तानात बांधायचे का असा सवाल, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी उपस्थित केला. यापूर्वीही गिरिराज सिंह यांनी राम मंदिरविषयी वक्तव्य केले आहे.

मुस्लिम समाजातील शियांनी राम मंदिरसाठी पाठिंबा दिलाय तसेच सुन्नीनीही सर्मथन देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. मी नेहमी सोशल मीडियावर माझी मतं मांडत असतो. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रगतीत अडथळे निर्माण होतात. चीनमध्ये प्रत्येक मिनिटाला ११ मुलं होतात. तर तेच भारतातील प्रमाण हे २९ असल्याचे ते म्हणाले. जगातील १८ टक्के लोकसंख्याही भारतात असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात १० पैकी एका व्यक्तीला पिण्याचे पाणी मिळणार नाही. हे सामाजिक सुसंवाद आणि विकासासाठी घातक आहे. जिथे हिंदुंची लोकसंख्या घटली आहे. तिथे सामाजिक सुसंवाद कमी झाल्याचेही ते म्हणाले.

गिरिराज सिंह यांनी यापूर्वी पद्मावत चित्रपटाविषयी वक्तव्य केले होते. हिंमत असेल तर संजय लीला भन्साळी यांनी मोहम्मद पैगंबरांवर चित्रपट बनवून त्यात त्यांचे चरित्र दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले होते. जेव्हा राजस्थानमध्ये पद्मावत चित्रपटाचे चित्रीकरण होत होते. तेव्हा भन्सालींनी ते बंद का केले नाही ? गांधीजींवर चित्रपट काढून त्यात त्यांना कथ्थक आणि भांगडा करताना दाखवलं तर मी माफ करणार नाही. मोहम्मद साहेबांवर चित्रपट काढून त्यांचे त्यात चरित्र दाखवण्याची कोणामध्ये हिंमत आहे का, असे ते म्हणाले होते.