दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आली. यानंतर न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना ईडी कोठडी सुनावली. केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईविरोधात इंडिया आघाडीने एकजूट दाखवत आज दिल्लीत ‘लोकतंत्र बचाओ महारॅली’चे आयोजन केले आहे. इंडिया आघाडीच्या या रॅलीत जवळपास देशभरातील २८ पक्ष सहभागी होणार आहेत. या रॅलीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यादेखील सहभागी होणार असून त्या रॅलीला त्या संबोधित करण्याची शक्यता आहे.

अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. केजरीवाल यांच्यावरील कारवाईनंतर सुनीता केजरीवाल यांनी अनेकदा पत्रकार परिषदा घेत संवाद साधला. अरविंद केजरीवाल तुरुंगात असल्यामुळे दिल्लीचे सरकार संकटात आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी सुनीता केजरीवाल या विराजमान होऊ शकतात, अशाही चर्चा आहेत.

इंडिया आघाडीत एकजूट नाही, अशा प्रकारची टीका अनेकदा सत्ताधारी भाजपाकडून करण्यात येते. आता या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा दिल्लीत ‘लोकतंत्र बचाओ महारॅली’चे आयोजन करत इंडिया आघाडीमध्ये एकजूट असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रॅलीमध्ये तृणमूल काँग्रेसचाही सहभाग असणार आहे.

हेही वाचा : “…म्हणून अरविंद केजरीवाल यांना अटक केली”; उद्धव ठाकरे यांचा भाजपावर खळबळजनक आरोप

सुनीता केजरीवाल यांनी सुरू केली व्हॉट्सअॅप मोहीम

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी निर्देशने करण्यात येत आहेत. यातच सुनीता केजरीवाल यांनी ‘केजरीवालांना आशीर्वाद’ या नावाने व्हॉट्सअॅप मोहीम सुरू केली आहे. आम आदमी पक्षासाठी सुनीता केजरीवाल या सध्या निर्णायक भूमिका घेताना दिसत असून त्या सध्या सक्रीय झाल्या आहेत.

अरविंद केजरीवाल यांना १ एप्रिलपर्यंत कोठडी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत कोठडी दिली आहे. मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांना ईडीकडून तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, तरीही केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यानंतर त्यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली होती.