नवी दिल्ली : आर्थिक वाढ कायम राखतानाच भारत संपूर्ण खबरदारीसह करोनाच्या आणखी एका लाटेशी लढा देत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.

‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या दृष्टिकोनाचा अंगीकार करून भारत महासाथीच्या काळात अनेक देशांना आवश्यक औषधे आणि लशींचा पुरवठा करून कोटय़वधी जीव कसे वाचवत आहे हे जगाने पाहिले आहे, असे  वल्र्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंडय़ात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण देताना मोदी यांनी सांगितले.

 भारतासारख्या मजबूत लोकशाहीने जगाला एक सुंदर भेट दिली आहे व ती म्हणजे ‘आशेचा पुष्पगुच्छ’ होय. या पुष्पगुच्छात आम्हा भारतीयांचा लोकशाहीवरील अतूट विश्वास आहे. भारताने सुधारणांवर योग्य रीतीने लक्ष केंद्रित केले असून, भारतात गुंतवणूक करण्याची हीच सर्वात योग्य वेळ आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

‘भारत कधीकाळी लायसन्स राजसाठी ओळखला जात असे. आज आम्ही ईझ ऑफ डुइंग बिझिनेसला आणि उद्योगांमध्ये सरकारचा सहभाग कमी करण्यास प्रोत्साहन देत आहोत,’ असे मोदी यांनी सांगितले. आपले सरकार भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या मार्गावर असून, यात केवळ प्रक्रिया सोप्या करण्यावर रोख नसून गुंतवणूक व उत्पादन यांना प्रोत्साहन देण्यावरही आहे, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

पुढील २५ वर्षांचा विचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 ‘जागतिक तज्ज्ञांनी भारताच्या निर्णयाची प्रशंसा केली असून जगाच्या आमच्याकडून असलेल्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू,’ अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. येत्या २५ वर्षांतील भारताची प्रगती स्वच्छ आणि हरितच नव्हे, तर टिकाऊ आणि विश्वासार्ह असेल. भारताची धोरणे व निर्णयप्रक्रिया केवळ सध्याच्या गरजांवर नव्हे, तर पुढील २५ वर्षांतील ध्येयांवर आधारित आहेत, असेही त्यांनी नमूद केले.