पीटीआय, नवी दिल्ली
केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी)ने अनेक राज्यांत मोठ्या प्रमाणात पूर येण्याचा इशारा दिला आहे. विविध राज्यांमध्ये २२ नद्यांंची गंभीर पूरस्थिती नोंदविण्यात आली असून २३ नद्यांमध्ये सामान्यापेक्षा जास्त पातळी नोंदविण्यात आल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. यामध्ये आसाम, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील केंद्रांचा समावेश आहे.

पुढील २४ तासांत गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही भागात अचानक पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यास अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहनही आयोगाकडून करण्यात आले आहे. तसेच अनेक मोठे प्रकल्प आधीच पूर्ण क्षमतेच्या जवळ पोहोचले असल्याने सीडब्ल्यूसीने धरण अधिकाऱ्यांना जलाशय काळजीपूर्वक चालवण्यास सांगितले आहे.

नद्यांची गंभीर श्रेणी

  • बिहार, उत्तर प्रदेशातील प्रत्येकी आठ
  • गुजरात, दिल्ली, झारखंड, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एक

धरणांची स्थिती

कर्नाटकातील १२, तेलंगणातील सहा, आंध्र प्रदेशातील पाच आणि मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, ओडिशा, महाराष्ट्र आणि उत्तराखंडसह ४६ धरणे आणि बंधाऱ्यांसाठीही पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज जारी करण्यात आला आहे.

गुजरातमधील सहा जिल्ह्यांना ’हाय अलर्ट’

गुजरातमध्ये, नर्मदा, तापी, दमणगंगा आणि साबरमती सारख्या नद्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार प्रवाह सुरू राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भरूच, सुरत, वडोदरा, साबरकांठा, बनासकांठा आणि राजकोट जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • राजस्थानमध्ये, माही, साबरमती, चंबळ आणि बनास सारख्या नद्यांची पाण्याची पातळी वाढत आहे, ज्यामुळे प्रतापगड, बांसवाडा, उदयपूर, कोटा, बुंदी आणि झालावाड येथे तीव्र पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मुसळधारा

महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे आणि पुणे येथे खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापी, वैतरणा, भीमा आणि कोयना सारख्या नद्या गंभीर पूर पातळी गाठू शकतात.

उत्तर प्रदेशात परिस्थिती गंभीर

उत्तर प्रदेशातील मथुरा, बलिया, शाहजहांपूर, बाराबंकी, फर्रुखाबाद आणि फतेहपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये गंगा, यमुना, रामगंगा आणि घाघरा नद्या धोक्याच्या पातळीपेक्षावर वाहत आहेत. बिहारमध्येही परिस्थिती गंभीर असून पाटणा, भागलपूर, सिवान आणि खगरियामध्ये गंगा, कोसी, गंडक आणि घाघरा नद्या गंभीर पूर पातळीवर आहेत.