भारत आणि इस्रायलने मंगळवारी दहशतवादविरोधी सहकार्यावर चर्चा केली. तसेच, व्यापारी संबंध आणखी बळकट कसे होतील, यावरही दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. ‘दहशतवादाकडे आणि या दहशतवादाच्या सर्व प्रकारांकडे जागतिक स्तरावर ‘शून्य सहिष्णुते’ने पाहावे, यासाठी भारत-इस्रायलने चर्चा करणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन जयशंकर यांनी या वेळी केले.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडियन जार यांच्यामध्ये या विषयांवर चर्चा झाली. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू पुढील काही महिन्यांमध्ये भारत भेटीवर येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. जार हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, ‘इस्रायलला गाझामधील हमास, लेबनॉनमधील हेजबोला आणि येमेनमधील हुती या मूलतत्त्ववादी दहशतवाद्यांचा धोका आहे. हमासचे पूर्ण निर्मूलन हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियोजनाचा गाभा आहे. हमास नि:शस्त्र झालीच पाहिजे. गाझा निर्लष्करी झालेच पाहिजे. यावर आम्ही कदापि तडजोड करणार नाही.’
‘संकटाच्या काळात आम्ही परस्परांच्या मागे उभे राहिलो आहोत. दोन्ही देशांतील संबंधांमध्ये उच्च प्रतीची विश्वासार्हता आहे. दोन्ही देशांना दहशतवादाचे विशिष्ट असे आव्हान आहे. दहशतवादाकडे आणि या दहशतवादाच्या सर्व प्रकारांकडे जागतिक स्तरावर ‘शून्य सहिष्णुते’ने पाहावे, यासाठी आम्ही काम करणे आवश्यक आहे. – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री
