संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेवर भारताची टीका

नवी दिल्ली :

जम्मू-काश्मीरमध्ये एका मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेबाबत ‘निराधार’ आरोप केल्याबद्दल भारताने गुरुवारी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेवर टीका केली. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाविषयक आव्हानांचे संबंधितांना अजिबात आकलन नसल्याचे या शेरेबाजीवरून दिसून येते, असेही भारताने ठामपणे सांगितले.

भारतातील अधिकारी कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध कारवाई करतात, अधिकारांच्या वैध पालनाविरुद्ध नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.

काश्मिरी मानवाधिकार कार्यकर्ते खुर्रम परवेझ यांच्या अटकेबाबत संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांच्या (हाय कमिशनर फॉर ह्य़ुमन राइट्स- ओएचसीएचआर) कार्यालयाने केलेल्या निवेदनावर बागची यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जम्मू- काश्मीरमधील विशिष्ट घटनांबाबत उच्चायुक्त कार्यालयाने केलेले निवेदन आम्ही पाहिले आहे. या निवेदनात भारतातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था व सुरक्षा दले यांच्याविरुद्ध निराधार आरोप करण्यात आले आहेत’, असे बागची म्हणाले. परवेझ यांच्या अटकेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना, ओएचसीएचआरचे प्रवक्ते रुपर्ट कोलव्हिल यांनी जम्मू- काश्मीरमध्ये अलीकडेच झालेल्या नागरिकांच्या हत्यांचा ‘जलद, संपूर्ण व पारदर्शक’ तपास व्हावा असे आवाहन केले होते.