Pakistan-Afghanistan Conflict: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळाले होते. यादरम्यान पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अफगाण तालिबान हे भारताच्या वतीने छुपे युद्ध म्हणजेच ‘प्रॉक्सी वॉर’ लढत असल्याचा आरोप केला होता. यानंतर भारताने पाकिस्तानला त्यांच्या स्वत:च्या अंतर्गत अपयशासाठी शेजार्यांवर दोष टाकण्याची जुनी सवय असल्याचे सांगत हा दावा फेटाळून लावला आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात बुधवारी झालेल्या युद्धविरामावर (fragile भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. पाकिस्तानने काबूल आणि कंदाहार येथे केलेल्या कथित हवाई हल्ल्यांनंतर दोन देशांमध्ये संघर्ष पेटला होता, अनेक दिवस चाललेल्या सीमा भागातील या संघर्षात दोन्ही बाजूचे अनेक लोक मारले गेल्याची माहिती आहे.
पूर्ण आठवडाभर चाललेल्या संघर्षावर भारताने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भारताने अफगाणिस्तानला ठामपणे पाठिंबा दिला, आणि म्हटले की अफगाणिस्तानला त्यांच्या स्वत:च्या प्रदेशावर सार्वभौमत्वाचा वापर करण्याचा अधिकार आहे. “आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पाकिस्तान दहशतवादी संघटनाना आश्रय देतो आणि दहशतवादी कारवायांना पाठबळ पुरवो. शेजाऱ्यांना दोष देणे ही पाकिस्ताची जुनी सवय आहे,” असे जयस्वाल म्हणाले.
“अफगाणिस्तान त्यांच्या स्वत:च्या प्रदेशावर सार्वभौमत्वाचा वापर करत असल्याने पाकिस्तान चिडला आहे. अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे,” असेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते पुढे बोलताना म्हणाले.
भारत आणि तालिबान यांच्यातील संबंध सुधारत असतानाच हा पाठिंबा देण्यात आलेला आहे. असे असले तरी भारताने अद्याप काबूल येथील तालिबानी राजवटीला औपचारिकपणे मान्यता दिलेली नाही. मात्र तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्या नवी दिल्लीच्या पहिला दौऱ्यावेळी भारताने काबूलमधील आपला दूतावास पुन्हा उघडण्याची घोषणा केली आहे.
पाकिस्तानचा आरोप काय आहे?
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील ४८ तासांच्या युद्धविरामाबद्दल शंका व्यक्त करताना, तालिबान भारताच्या वतीने छुपे युद्ध (proxy war) लढत असल्याचा दावा केला. यानंतर भारताने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“हा युद्धविराम टिकेल की नाही याबद्दल मला शंका आहे, कारण (अफगाण) तालिबानचे निर्णय दिल्लीकडून स्पॉन्सर केले जात आहेत… सध्या काबूल दिल्लीसाठी प्रॉक्सी वॉर लढत आहे,” असे आसिफ यांनी जिओटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले.