India-Pakistan Tensions: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हल्ले केले होते. यानंतर पाकिस्तानने भारतीय नागरिकांना लक्ष्य करत सीमेलगतच्या शहरांवर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होता. भारतीय लष्कराने या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत ते परतावून लावले होते.
दरम्यान काल दोन्ही देशांमध्ये शस्त्रविराम जाहीर झाल्यानंतर काही तासांतच आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून हल्ल्याचे प्रयत्न करण्यात आले. यावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी हिंदी कवितेच्या ओळी लिहून पाकिस्तानला फटकारले आहे.
शशी थरूर यांनी एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की,“उसकी फितरत है मुकर जाने की… उसके वादे पर यकीन कैसे करू?”, याचा अर्थ असा आहे की, “दिलेला शब्द न पाळणे हा त्यांचा स्वभाव आहे. मी त्यांच्या वचनावर कसा विश्वास ठेवू?”. या पोस्टमध्ये शशी थरूर यांनी ‘युद्धविरामभंग’ हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
…हे पाकिस्तानच्या हातात
तत्पूर्वी, परराष्ट्र व्यवहारांवरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले शशी थरूर म्हणाले होते की, “हा संघर्ष कमी करयचा की लांबवायचा हे पाकिस्तानच्या हातात आहे. दोन्ही देशांमधील सुरू असलेला संघर्ष भारताने सुरू केलेला नाही तर पाकिस्तानने सुरू केलेला आहे. जर पहलगाममध्ये पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला नसता, तर भारताने प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू केले नसते. आपण फक्त पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच हल्ला केला.”
भारतीय सैन्यासमोर टीकू शकणार नाहीत
थरूर पुढे म्हणाले होते की, “हा संघर्ष संपवणे पाकिस्तानच्या हातात आहे. पाकिस्तानी लोकांकडेच याची चावी आहे. कारण मला वाटत नाही की, पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्याविरुद्ध जास्त काळ टिकू शकेल. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच पूर्णपणे कोलमडली आहे. भारताने हे स्पष्ट केले आहे की, आम्हाला युद्ध नको आहे. परंतु दहशतवाद्यांना असे वाटू नये की, ते निष्पापांना मारून शिक्षेशिवाय सुटू शकतात.”
कालपासून शस्त्रविराम
भारत व पाकिस्तानदरम्यान शनिवारी १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून शस्त्रविराम लागू करण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती. दोन्ही देशातील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फोनवरून चर्चा झाल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
दरम्यान शस्त्रविरामादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये मध्यस्थी केल्याची बाबा समोर आली होती. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंबंधी माहिती दिली होती.