Shashi Tharoor On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाची जगात चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. या टॅरिफचे परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहेत. यातच ३० जुलै रोजी ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत भारताला धक्का दिला. अमेरिका आता भारतावर १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ लागू करणार आहे. अमेरिकेच्या या निर्णायाचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एवढंच नाही तर रशियाबरोबर भारताने व्यवसाय केल्यामुळे दंडही वसूल करणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर भारत सरकारनेही एक निवेदन जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अमेरिकेच्या या निर्णयाचा काय परिणाम होईल याचा अभ्यास सरकार करत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अमेरिकेच्या या टॅरिफच्या मुद्यांवरून आता अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. यावर आता काँग्रेसचे नेते तथा खासदार शशी थरूर यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जाहीर केलेला २५ टक्के आयात कर हा एक अतिशय गंभीर मुद्दा असून ट्रम्प यांचा हा निर्णय भारताचा अमेरिकेबरोबरचा व्यापार उद्ध्वस्त करेल’, असं खासदार शशी थरूर यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हटलं असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

शशी थरूर काय म्हणाले?

ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना खासदार शशी थरूर यांनी म्हटलं की, “ही आमच्यासाठी खूप गंभीर बाब आहे. कारण २५ टक्के टॅरिफ आणि रशियाकडून तेल आणि वायू खरेदी केल्याबद्दल दंड, तो देखील ३५-४५ टक्यांपर्यंत असू शकतो. १०० टक्के दंडाचीही चर्चा आहे. ज्यामुळे अमेरिकेबरोबरचा भारताचा व्यापार उद्ध्वस्त होईल”, असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

शशी थरूर पुढे म्हणाले की, “अमेरिका आणि भारतामध्ये व्यापार वाटाघाटी अजूनही सुरू आहेत. त्यामुळे २५ टक्के टॅरिफ कमी होण्याची शक्यता आहे. पण जर तसं झालं नाही, तर आपल्या निर्यातीचं मोठं नुकसान होईल. कारण अमेरिका आमच्यासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे. दुसरीकडे जर अमेरिकेच्या मागण्या पूर्णपणे अवास्तव असतील तर आमच्या वाटाघाटीकर्त्यांना प्रतिकार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे अमेरिकेला भारताच्या गरजा देखील समजून घ्याव्या लागतील. तसेच अमेरिकेवरील भारताचे शुल्क इतकंही अवास्तव नाही, सुमारे १७ टक्क्यांच्या आसपास आहे. अमेरिकन वस्तूंची किंमत भारतीय बाजारपेठेत विकण्यासाठी पुरेशी स्पर्धात्मक नाही”, असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेकडून भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी बुधवारी (३० जुलै) मोठी घोषणा केली. त्यांनी म्हटलं आहे की येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून भारताला २५ टक्के टॅरिफ (आयात शुल्क) भरावं लागेल. ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक पोस्ट करून यासंबधीची माहिती दिली. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की भारत व अमेरिका मित्र राष्ट्रे असूनही गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांमध्ये फारसे व्यावसायिक व्यवहार झालेले नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताकडून दंड वसूल केला जाईल : ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “भारत गेल्या अनेक वर्षांपासून बहुतेक लष्करी उपकरणं, शस्त्रं रशियाकडून खरेदी करत आला आहे. तसेच ऊर्जा खरेदीतही भारत चीनबरोबर रशियाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. रशियाचा युक्रेनमध्ये हैदोस चालू आहे. रशियाचा युक्रेनमधील विध्वंस थांबावा यासाठी सगळं जग प्रयत्न करत आहेत. अशा वेळी भारताने रशियाला अशा प्रकारे आर्थिक लाभ मिळवून देणं योग्य नाही. त्यामुळे भारताला १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ व तथा दंड भरावा लागेल. वर नमूद केलेल्या कारणांसाठी भारताला दंड भरावा लागेल.”