Indian Army vs Donald Trump Tarrif War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारतावर आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची धमकी देत आहे. ट्रम्प व व्हाइट हाउसमधील त्यांचे अधिकारी आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारताला इशारे देत आहेत, भारताकडून दंड वसूल करण्याची भाषा वापरली जात आहे. दुसऱ्या बाजूला, भारताचा परराष्ट्र विभाग अमेरिकेशी दोन हात करत आहे. अशातच परराष्ट्र विभागाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर सरसावलं आहे. भारतीय लष्कराने अमेरिकेच्या शांततावादाचा बुरखा फाडला आहे. ट्रम्प प्रशासन युक्रेन युद्धात भारत रशियाची मदत करत असल्याचा कांगावा करत असतानाच भारतीय लष्कराने अमेरिकेच्या भारताविरोधातील कुरापतींचे पुरावे सादर केले आहेत.
१९७१ च्या युद्धावेळी अमेरिका पाकिस्तानला हाताशी धरून भारताविरोधात कटकारस्थान रचत होती. त्याचे पुरावे भारतीय लष्कराने समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडने एक्सवर वर्तमान पत्रातील एक बातमी शेअर केली आहे. ही बातमी ५४ वर्षे जुनी आहे. या बातमीत म्हटलं आहे की १९५४ ते १९७१ या १७ वर्षांमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला २ बिलियन डॉलर्सहून (१ लाख कोटी रुपये) अधिक किमतीची शस्त्रास्रे पुरवली होती.
अमेरिकेने १९६५ व १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांची बीजं आधीच पेरली होती
भारतीय लष्कराने जुन्या वर्तमानपत्राचं एक कात्रण शेअर केलं आहे. हे ५ ऑगस्ट १९७१ च्या अंकामधील कात्रण आहे. अमेरिका अनेक दशकांपासून पाकिस्तानला शस्त्रास्रे पुरवत होती. या शस्त्रास्रांच्या बळावरच पाकिस्तान सातत्याने भारताला युद्धाचं आव्हान देत होता. अमेरिकेने दिलेली शस्त्रास्रं पाकिस्तानने वेळोवेळी भारताविरोधात वापरली होती. उभय देशांमध्ये झालेल्या प्रत्येक संघर्षात पाकिस्तानने अमेरिकेची ‘भेट’ भारताविरोधात वापरली होती. अमेरिकेने १९६५ व १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांची बीजं आधीच पेरली होती.
वर्तमानपत्राचं कात्रण शेअर करत भारतीय लष्कराने म्हटलं आहे की “त्या वर्षी आजच्याच दिवशी युद्धाची तयारी करण्यास सुरुवात झाली होती – ५ ऑगस्ट १९७१”. वर्तमानपत्राच्या कात्रणात भारताचे तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री व्ही. सी. शुक्ला यांचं वक्तव्य देखील आहे. शुक्ला यांनी राज्यसभेत माहिती देताना सांगितलं होतं की बांग्लादेशमध्ये भडकलेल्या हिंसाचारावेळी अमेरिकेने शस्त्रे पुरवली होती. या कात्रणात म्हटलं आहे की अमेरिका व चीनने पाकिस्तानला शस्त्रास्रे पुरवली होती. याच शस्त्रास्रांच्या बळावर पाकिस्तान १९७१ चं युद्ध लढला.