Donald Trump 50 Percent Tariff On India And Indian Government Answer: काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादले होते. त्यानंतर भारताने रशियाकडून तेल आयात चालूच ठेवली असल्याने ट्रम्प यांनी आणखी २५ टक्के टॅरिफ लादले आहे. अशा या वाढत्या जागतिक व्यापार तणावाच्या दरम्यान “भारत कोणासमोरही झुकणार नाही”, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. ते बिझनेस टुडे इंडिया@१०० शिखर परिषदेत बोलत होते.

जागतिक व्यापार भागीदारांसोबत भारताच्या भविष्यातील संबंधांबद्दल विचारले असता, गोयल म्हणाले की, देश आज “खूप मजबूत आणि आत्मविश्वासू” आहे, दरवर्षी साडेसहा टक्क्यांच्या दराने विकास होत आहे आणि याचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण सज्ज आहोत.

…त्यासाठी आधीच उपाययोजना केल्या आहेत

जग “अजागतिकीकरण” पाहत आहे, ही कल्पना नाकारून, त्यांनी असा युक्तिवाद केला की अनेक देश फक्त त्यांच्या व्यापार मार्गांची आणि भागीदारांची पुनर्रचना करत आहेत. “मला पूर्ण विश्वास आहे की भारत गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अधिक निर्यात करेल”, असे ते म्हणाले. व्यापारातील अडथळ्यांना तोंड देण्यासाठी उपाययोजना आधीच केल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

भारतात ५० लाख नोकऱ्या

भविष्यातील मुक्त व्यापार करारांबद्दल बोलताना गोयल म्हणाले की, भारताचा दृष्टिकोन केवळ शुल्क सवलती मिळविणे नसून, तो त्या पलीकडे विकसित झाला आहे. चार देशांच्या EFTA गटाशी झालेल्या वाटाघाटीदरम्यान गोयल यांनी त्यांना सांगितले होते की, “आम्ही ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आहोत आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहोत. आमच्याकडे तरुणांची शक्ती आहे, तर तुमच्याकडे वृद्ध लोकसंख्या आहे.”

ते म्हणाले की, EFTA गटातील देशांनी भारतात १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली आहे, ज्यामुळे एकूण ५० लाख आणि थेट १० लाख नोकऱ्या निर्माण होतील. “१ ऑक्टोबरपासून, EFTA करार अंमलात येणार आहे आणि त्याचे फायदे दिसून येतील,” असे ते पुढे म्हणाले.

संपूर्ण जग आपल्याला…

भारताच्या आर्थिक लवचिकतेवर प्रकाश टाकताना गोयल यांनी नमूद केले की देशाचे चलन, परकीय चलन साठा, शेअर बाजार आणि फंडामेंटल्स मजबूत आहेत, इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत महागाई जगातील सर्वात कमी आहे.

“संपूर्ण जग आपल्याला सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखते, जागतिक विकासात १६ टक्के योगदान देते”, असे ते म्हणाले. भारताचे तरुण, कुशल आणि महत्त्वाकांक्षी नागरिक जागतिक भागीदारांसाठी एक शक्तिशाली आकर्षण आहेत.