हैदराबादमध्ये २०१३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि प्रमुख आरोपी रियाज भटकळ हा पाकिस्तानातील कराचीमध्ये लपला असून, ऐशोआरामात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने रियाजला आश्रय दिला असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सांगितले आहे, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. दरम्यान, हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या पाच जणांना हैदराबाद न्यायालयाने दोषी ठरवले त्यात यासीन भटकळचाही समावेश आहे.
रियाजने आयएसआयच्या मदतीने मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली आहे, असा दावा एनआयएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. हैदराबादमधील दिलसुखनगर बॉम्बस्फोटप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोषारोप पत्रात एनआयएने अनेक महत्त्वाच्या बाबी नमूद केल्या आहेत. इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना आयएसआयने आर्थिक आणि इतर अनेक प्रकारची मदत केली आहे. आयएसआयनेच रियाज आणि त्याचा भाऊ इक्बाल भटकळ यांना कराचीत आश्रय दिला आहे. रियाज सध्या कराचीत ऐश्वर्याचं जीवन जगत असल्याचा दावा एनआयएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. एनआयएच्या सूत्रांनुसार, आयएसआयच्या आश्रयाला जाण्याचा रियाजने घेतलेला निर्णय त्याच्या पथ्यावर पडला आहे. त्यामुळेच त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली आहे. रियाजकडे पाकिस्तानचा पासपोर्ट आहे. त्यामुळे त्याच्या हालचालींवर नजर ठेवणे एनआयएला कठीण जात आहे. स्फोट घडवून आणण्यासाठी रियाजने हवालाच्या माध्यमातून सव्वा लाख रुपये ट्रांसफर केले होते. स्फोटानंतरही यूएईतून त्याने ७० हजार रुपये पाठवले होते. दिलसुखनगर स्फोटाआधी रियाज सतत यासीन भटकळच्या संपर्कात होता,अशी माहितीही एनआयएने दिली आहे.
दरम्यान, हैदराबादमध्ये २०१३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १८ जण ठार, तर १३१ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी रियाज भटकळ अद्याप फरार आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने यासीन भटकळ, उत्तर प्रदेशातील असदुल्ला अख्तर, पाकिस्तानचा जिया- उर- रहमान ऊर्फ वकास, बिहारचा तहसीन अख्तर आणि महाराष्ट्राचा एजाज शेख यांना दोषी ठरवले आहे.