तुषार वैती
१९७४-७५ साली पहिल्यांदाच वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या अंशुमन गायकवाड यांनी कर्णधार टायगर मन्सूर अली खान पतौडी यांना विचारण्याचं धाडस केलं. ‘तुम्ही मला काही टिप्स का देत नाहीत?’ यावर पतौडींचे उत्तर म्हणजे अंशुमन यांना सणसणीत चपराकच होती. ‘‘तुम्ही भारतासाठी खेळायला इथे आलात, त्यामुळे काय करायचं हे तुम्हाला माहीत असायला हवं. जर माहीत नसेल तर माझा वेळ वाया घालवू नका!’’
देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक खेळाडू तावून-सुलाखून निघालेला असतो. त्यामुळे त्याला फार काही शिकवण्याची गरज नसते. पण काळ बदलला, तसं क्रिकेटचं स्वरूपही बदललं. प्रत्येक संघाचं वर्षभराचं वेळापत्रक अधिकच व्यग्र झालं. त्यामुळे खेळाडूंना आपल्या चुका सुधारण्यासाठी फार कमी वेळ मिळू लागला. मुख्य प्रशिक्षकांना संघातील १५ खेळाडूंच्या कामगिरीचे विचारमंथन करण्यासाठीही वेळ कमी पडू लागला. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकाशिवाय साहाय्यक प्रशिक्षकांनाही महत्त्व आलं. तिन्ही आघाडय़ांतील बारकावे शिकण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांची गरज भासू लागली. नेतृत्व, रणनीती, कठीण परिस्थितीतही ताठ मानेनं मैदानावर उभे राहणं, क्षेत्ररक्षण लावणं आणि क्रिकेटमधील तणावाच्या परिस्थितीला सामोरे जाणं, या गोष्टी शिकवण्यासाठी त्या-त्या प्रशिक्षकांची मोलाची मदत होऊ लागली. भारतानंही अनेक परदेशी प्रशिक्षकांना संधी दिल्यानंतर रवी शास्त्री यांनी भारताला अनेक यशस्वी क्षण अनुभवण्याची संधी दिली. भारताच्या सहप्रशिक्षकांच्या ताफ्यातही फिजियो पॅट्रिक फरहार्ट वगळता भारतीयांनाच पसंती देण्यात आली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चाचपडणाऱ्या अनेक संघांनी सहप्रशिक्षक म्हणून भारतीयांची मदत घेतली आहे. प्रशिक्षणातील भारतीय ताकदीचा घेतलेला हा धांडोळा झ्र्
सुनील जोशी (बांगलादेशचे फिरकी प्रशिक्षक)
१९९६मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सुनील जोशी यांनी १५ कसोटी आणि ६९ एकदिवसीय सामन्यांमध्ये मिळून ११० बळी मिळवले आहेत. २०१६मध्ये ओमानच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदाची भूमिका निभावणाऱ्या जोशी यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची संधी वाया घालवली नाही. बांगलादेशच्या फिरकीपटूंचा मानसिक दृष्टिकोन बदलण्यात तसेच त्यांच्या क्षमता आणि कच्चे दुवे ओळखून फिरकीपटूंना परिपक्व गोलंदाज बनवण्यात जोशी यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच शाकिब अल हसन, मेहिदी हसन, तैजूल इस्लाम यांच्या चमकदार कामगिरीचे श्रेय जोशी यांना जाते. जोशींनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू आणि काश्मीर, हैदराबाद तसेच आसाम या संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे.
उमेश पटवाल (अफगाणिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षक)
मुंबईतील मैदानांमध्ये युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या उमेश पटवाल यांच्याकडून फलंदाजीचे सल्ले घेण्यासाठी अफगाणिस्तानचा कर्णधार असगर स्टॅनिकझाई आणि मोहम्मद नबी मुंबईत आले होते. त्यांच्यातील नातेसंबंध इतके घट्ट झाले की २०१४ आणि २०१६मध्ये पटवाल यांना अफगाणिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षकपद भूषवण्याची संधी मिळाली. विश्वचषकातील पात्रता फेरीसाठी नेपाळने त्यांची मदत घेतल्यानंतर उमेश पुन्हा एकदा अफगाणिस्तान संघात दाखल झाले. गेल्या वर्षी बंद-ए-आमीर ड्रॅगन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहताना बॉम्बस्फोट झाले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी रशिद खानच्या नेतृत्वाखालील संघाला स्पागीझा क्रिकेट लीगचे जेतेपद मिळवून दिले.
प्रसन्ना अगोराम (दक्षिण आफ्रिकेचे तांत्रिक विश्लेषक)
अभ्यासात हुशार असणाऱ्या चेन्नईतील प्रसन्ना अगोरामने अभियंत्याची पदवी मिळवली, पण त्याचे मन सतत क्रिकेटमध्येच राहिले. तामिळनाडूच्या १९ वर्षांखालील संघाचा भाग असलेला प्रसन्ना पंचगिरीनंतर व्हिडीओ विश्लेषणाकडे वळला. बेंगळूरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या तांत्रिक विश्लेषकाची भूमिका निभावणाऱ्या प्रसन्नाला २००८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाचे काम करण्याची संधी मिळाली. बेंगळूरु संघात दक्षिण आफ्रिकेच्या अनेक खेळाडू आणि प्रशिक्षकांचा समावेश असल्यामुळे प्रसन्नाच्या कामावर बेहद खूश होऊन त्याला आफ्रिकेचा तांत्रिक विश्लेषक म्हणून नियुक्त करण्यात आले. २०११मध्ये भारताने विश्वचषक जिंकला, पण भारताला एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेकडून पत्करावा लागला. त्यात पडद्यामागून सूत्रे हलवणाऱ्या प्रसन्नाची कामगिरी मोलाची होती. प्रसन्नाच्या तांत्रिक विश्लेषणामुळे दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उंचावत गेली आहे.
प्रदीप साहू (ऑस्ट्रेलियाचे फिरकी प्रशिक्षक)
हरयाणा आणि नंतर मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या प्रदीप साहू यांनी मुंबईच्या कांगा लीगमध्ये एका डावात १० बळी मिळवण्याचा पराक्रम केला होता. ‘आयपीएल’मध्ये राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघात निवडल्या गेलेल्या प्रदीपला ऑस्ट्रेलियाच्या फिरकी प्रशिक्षकपदी संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आशियातील फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर खेळण्याचा सराव व्हावा, यासाठी प्रदीपसह केरळचा केके जियास यांना नियुक्त करण्यात आले. या दोघांमुळे नुकत्याच झालेल्या भारतीय दौऱ्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी कुलदीप यादव आणि यजुर्वेद्र चहल यांची फिरकी सहजपणे खेळून काढली. आता याच दोघांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फिरकी गोलंदाजीवर तुटून पडत आहेत.