एपी, टोरोंटो (कॅनडा) : कॅनडातील ऑन्टारियोमध्ये झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या २८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सोमवारी झालेल्या या घटनेत अन्य दोन जणांचाही मृत्यू झाला आहे.

हिल्टन पोलिसांनी सांगितले, की सतिवदर सिंग या विद्यार्थ्यांचा हॅमिल्टन सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सतिवदर हा भारतातून येथे शिकण्यासाठी आलेला विद्यार्थी होता. येथील ‘एम. के. ऑटो रिपेअर्स’ या दुकानात तो अर्धवेळ नोकरी करत होता. या दुर्घटनेत सतिवदरचे निधन झाल्याबद्दल हिल्टन प्रांतीय पोलीस सेवा (एचआरपीएस) सतिवदर सिंह याचे आप्तस्वकीय आणि संबंधित समूहाच्या दु:खात सहभागी आहे.

ऑन्टारियो येथे सोमवारी झालेल्या या गोळीबारात याआधी टोरोंटोचे पोलीस कर्मचारी अँडर्य़ू होंग (४८) व ‘एम. के. ऑटो रिपेअर्स’ या दुकानाचे मालक शकील अशरफ (३८) या दोघांचा मृत्यू झाला आहे. सीन पेट्री या ४० वर्षीय हल्लेखोराचा पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला.

सतिवदरची बहीण सरबजीत कौर यांनी ‘टोरोंटो स्टार’ या वृत्तपत्रास सांगितले, की सतिवदरच्या वडिलांनी त्याची जीवनरक्षक प्रणाली हटवण्यास शनिवारी अनुमती दिली. करोना महासाथीआधी त्यांची सतिवदरशी भेट झाली होती. ते दुबईत चालक म्हणून नोकरी करतात. सतिवदरवर गोळीबार झाल्यानंतर ते कॅनडात पोहोचले. सतिवदरचे पार्थिव भारतात नेण्यासाठी ‘गो फंड मी’ या निधी गोळा करणाऱ्या स्वयंसेवी संघटनेने रविवापर्यंत ३५ हजार डॉलरपेक्षा जास्त निधी उभा केला आहे.