India On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा जगाला फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरचे परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहेत. असं असतानाच आज (३० जुलै) डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धक्का देणारी मोठी घोषणा केली आहे. आता भारतावर अमेरिका १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ लागू करणार आहे. एवढंच नाही तर रशियाबरोबर भारताने व्यवसाय केल्यामुळे दंडही वसूल करणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारताला मोठा फटका सहन बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयावर आता भारत सरकारची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. भारत सरकारकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. ‘राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी भारत आवश्यक ते सर्व पावलं उचलेलं’, असं स्पष्ट करत भारताने अमेरिकेला सडेतोड उत्तर दिलं आहे.

भारताने काय म्हटलं?

अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिलं. या संदर्भात भारत सरकारने एक प्रेस निवेदन जारी करत म्हटलं की, भारत सरकारने द्विपक्षीय व्यापाराबाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विधानाची दखल घेतली आहे. अमेरिकेच्या २५ टक्के टॅरिफच्या परिणामाबाबत सरकार अभ्यास करत आहे. सरकारने म्हटले आहे की, “भारत आणि अमेरिका गेल्या काही महिन्यांपासून निष्पक्ष, संतुलित आणि परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार करारावर पोहोचण्यासाठी वाटाघाटी करत आहे. आम्ही या उद्दिष्टासाठी वचनबद्ध आहोत.”

“तसेच सरकार आपल्या शेतकरी, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कल्याणाचे रक्षण करण्यास सर्वोच्च महत्त्व देतं. युकेसोबतच्या व्यापक आर्थिक आणि व्यापार करारासह इतर व्यापार करारांच्या बाबतीत जे केलं गेलं आहे तसं सरकार आपल्या राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व पावले उचलेल”, असं निवेदनात म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

अमेरिकेकडून भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी बुधवारी (३० जुलै) मोठी घोषणा केली. त्यांनी म्हटलं आहे की येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून भारताला २५ टक्के टॅरिफ (आयात शुल्क) भरावं लागेल. ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक पोस्ट करून यासंबधीची माहिती दिली. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की भारत व अमेरिका मित्र राष्ट्रे असूनही गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांमध्ये फारसे व्यावसायिक व्यवहार झालेले नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताकडून दंड वसूल केला जाईल : ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “भारत गेल्या अनेक वर्षांपासून बहुतेक लष्करी उपकरणं, शस्त्रं रशियाकडून खरेदी करत आला आहे. तसेच ऊर्जा खरेदीतही भारत चीनबरोबर रशियाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. रशियाचा युक्रेनमध्ये हैदोस चालू आहे. रशियाचा युक्रेनमधील विध्वंस थांबावा यासाठी सगळं जग प्रयत्न करत आहेत. अशा वेळी भारताने रशियाला अशा प्रकारे आर्थिक लाभ मिळवून देणं योग्य नाही. त्यामुळे भारताला १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ व तथा दंड भरावा लागेल. वर नमूद केलेल्या कारणांसाठी भारताला दंड भरावा लागेल.”