भारतातील सर्वात उंच व्यक्ती असल्याचा दावा करणाऱ्या धर्मेंद्र प्रताप सिंग यांनी शनिवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. धर्मेंद्र प्रताप सिंग उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधून असून त्यांची उंची २.४ मीटर म्हणजेच ८ फूट १ इंच इतकी आहे. वर्ल्ड रेकॉर्डसाठी त्यांची उंची ११ इंचाने कमी आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी धर्मेंद्र प्रताप सिंग यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. त्यांच्या प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.

“समाजवादी पक्षाची धोरणं आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्तावर विश्वास दाखवत धर्मेंद्र प्रताप सिंग यांनी प्रवेश केला आहे. धर्मेंद्र प्रताप सिंग यांच्या प्रवेशामुळे पक्षाचं बळ वाढेल असा विश्वास प्रदेशाध्यक्षांना वाटत आहे,” असं पक्षाचे प्रवक्ते राजेश चौधरी यांनी सांगितलं आहे.

धर्मेंद्र प्रताप सिंग यांनी आपल्याला उंचीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असं सांगितलं असून पण याचमुळे आपण लोकांच्या आकर्षणाचं केंद्र असल्याचंही म्हटलं आहे. जेव्हा लोक माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी विनंती करतात, तेव्हा मला सेलिब्रिटी असल्यासारखं वाटतं असंही त्यांनी सांगितलं.

“माझ्या उंचीमुळे मी खूप प्रसिद्ध आहे,” असं धर्मेंद्र प्रताप सिंग यांना टेलिग्राफशी बोलताना सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेशात १० ते १७ फेब्रुवारी दरम्यान सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. १० मार्चला मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे समाजवादी पक्षही तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे. अखिलेश यादव यांनी शनिवारी मनिपुरी जिल्ह्यातून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून निवडणूक लढणार आहेत.