नवी दिल्ली : पाकिस्तानने गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी केलेल्या ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर देशाच्या पश्चिम सीमेवर तणाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने युद्धसज्जतेसाठी तयारी सुरू केली. शुक्रवारी सकाळपासूनच राजधानीमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. लष्करप्रमुखांना प्रादेशिक सेनेच्या जवान व अधिकाऱ्यांना अत्यावश्यक सेवेसाठी पाचारण करण्याचे अधिकार देण्यात आल्याची अधिसूचना जारी करण्यात आली. त्याच वेळी केंद्रीय गृह, आरोग्य, कृषी आदी मंत्र्यांनीही आपापल्या विभागांमधील सज्जतेचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
पाकिस्तानने गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतील सीमेलगतच्या भागांमध्ये तसेच, जम्मू विमानतळासारख्या देशाच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. किमान ५० ड्रोनच्या मदतीने १५ लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. प्रामुख्याने उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट येथील ड्रोन हल्ले निष्प्रभ करण्यात आले. पाकिस्तानकडून रात्रीच्या वेळी ड्रोन हल्ले सुरू राहण्याची शक्यता असल्याने संरक्षण दलाने लष्कराच्या मदतीसाठी देशभर प्रादेशिक सेनेच्या सुसज्जतेचे आदेश दिले. गुरुवारी रात्री झालेल्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सैन्यदल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग आणि नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर प्रादेशिक सेनेला पाचारण करण्याचा अधिकार लष्करप्रमुखांना प्रदान करण्यात आला. २४ तासांत झालेल्या या दुसऱ्या बैठकीत पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आखलेल्या रणनीतीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीमध्ये संरक्षण दलाचे प्रमुख व तिन्ही दलांचे प्रमुख व इतर अधिकारी यांच्याशी राजनाथ सिंह कोणत्याही तणावाविना स्मितहास्य करत चर्चा करत असल्याच्या छायाचित्राची शुक्रवारी दिवसभर चर्चा केली जात होती. या छायाचित्रातील तणावमुक्त चेहऱ्यांमुळे सकारात्मक चित्र निर्माण करण्यात केंद्र सरकार यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षणमंत्र्यांनी सीमाभागांतील परिस्थितीची माहिती दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही मोदींची भेट घेतली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही शुक्रवारी निमलष्करी दलांच्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीला केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, आयबीचे संचालक तपन डेका, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्याोगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि नागरी उड्डाण सुरक्षा कार्यालयाचे महासंचालक उपस्थित होते. बैठकीमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीसह पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या कारवायांबाबत बीएसएफला सूचना देण्यात आल्या. तसेच देशातील सर्व विमानतळांच्या सुरक्षेचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना नागरी सुरक्षा नियमाअंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यांच्या अखत्यारीतील सुरक्षा यंत्रणांतील कर्मचारी-अधिकारी यांच्या सुट्ट्या रद्द केल्या जाऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा केली व सीमाभागांतील गावांतील सुरक्षेसंदर्भातील माहिती घेतल्याचे समजते.
आरोग्य व कृषी मंत्रालयांमध्येही शुक्रवारी महत्त्वाच्या बैठका झाल्या. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन देशभरातील रुग्णालये आणि अन्य आरोग्य सुविधा तसेच, आपत्कालीन वैद्याकीय तयारीचा आढावा घेतला. रजेवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. औषधनिर्माण विभागाच्या सचिवांनीही नड्डांची भेट घेऊन अत्यावश्यक स्वरूपाची औषधे आणि वैद्याकीय उपकरणांची उपलब्धता आणि पुरवठा यांची माहिती दिली. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर तांदूळ आणि गव्हाची गोदामे भरलेली असून देशात अन्नसुरक्षेच्या दृष्टीने चिंता करण्याचे कारण नसल्याची माहिती मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जागतिक बँकेचा हस्तक्षेपास नकार
नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणीवाटप करार स्थगित केल्यासंदर्भात हस्तक्षेप करण्यास जागतिक बँकेने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ‘एक्स’वर निवेदन जारी केले. पाणीवाटपावरून निर्माण झालेला संघर्ष जागतिक बँक सोडवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवाझ शरीफ यांची मध्यस्थी?
लाहोर : भारताबरोबर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ मध्यस्थी करण्याची शक्यता आहे. विद्यामान पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचे थोरले बंधू असलेले नवाझ यांनी मागील दाराने भारताबरोबर चर्चा सुरू केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीगचे ते अध्यक्षही असून त्यांनी शुक्रवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला हजेरी लावली. बैठकीनंतर ‘‘भारताविरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी मी अनुकूल नाही,’’ अशी प्रतिक्रिया नवाझ शरीफ यांनी दिली.
घुसखोरीच्या प्रयत्नात सात दहशतवादी ठार
नवी दिल्ली/जम्मू : पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला असताना जम्मूच्या सांबा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलांनी हाणून पाडला. धनधर येथील पाकिस्तानी ‘रेंजर्स’च्या चौकीवरून मोठ्या प्रमाणात तोफांचा मारा केला जात होता. या माऱ्याच्या आडून दहशतवाद्यांचा मोठा गट घुसखोरीच्या प्रयत्नात होता. या हालचाली लक्षात आल्यानंतर बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत ‘रेंजर्स’ची चौकी उद्ध्वस्त केली. या कारवाईत किमान सात दहशतवादी ठार झाल्याची माहिती बीएसएफ प्रवक्त्याने सांगितले.
क्षेपणास्त्र भेदीप्रणाली यशस्वी
गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या वेळी काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा जोरदार हल्ला चढविला. मात्र यातील एकही क्षेपणास्त्र किंवा ड्रोन जमिनीपर्यंत येऊ शकले नाही. एस-४०० ट्रायम्फ, बराक-८ आणि आकाश या क्षेपणास्त्र प्रणालींचा उपयोग करून हा मारा यशस्वीरीत्या परतविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘डीआरडीओ’ने तयार केलेल्या ड्रोनविरोधी यंत्रणेद्वारे पाकिस्तानने सोडलेले शेकडो ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले.