पीटीआय, कोलकाता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) देशभरातील ७६६ जिल्ह्यांमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या तपासणीला सुरुवात केली आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी या महिन्यापासून हे सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती ‘एफएसएसएआय’च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.देशात विक्री केले जाणारे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अन्न सुरक्षा आणि मानक नियमनांचे पालन करतात का याचे मूल्यांकन करण्यासाठी हा अभ्यास हाती घेण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या भागामध्ये जास्त प्रमाणात भेसळ केली जाते हेही पाहिले जाईल. त्यानंतर सुधारात्मक कार्यवाही धोरणे आखली जातील. हे सर्वेक्षण ऑक्टोबपर्यंत सुरू राहील आणि डिसेंबरमध्ये त्याचा अहवाल आरोग्य मंत्रालयाला सोपवला जाईल असे ‘एफएसएसएआय’चे सल्लागार (गुणवत्ता खात्री) सत्येन के पांडा यांनी सांगितले. देशातील ७६६ जिल्ह्यांमध्ये १० हजारांपेक्षा जास्त नमुने संकलित केले जातील. यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली ‘भारतीय गुणवत्ता परिषद’ आणि ‘राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ’ या दोन संस्था कामाला लागल्या आहेत अशी माहिती पांडा यांनी दिली. हेही वाचा >>>ditya L1 आणि ISRO चं चॅटिंग सुरु; पृथ्वीपासून ५०,००० किमी दुरून पाठवतोय डेटा, ज्यामुळे.. या सर्वेक्षणात दूध, खवा, छेना, पनीर, तूप, लोणी, दही आणि आइस्क्रीम या पदार्थाची तपासणी केली जाईल. त्यामध्ये त्यांची भेसळ, सामान्य गुणवत्ता आणि घटक प्रमाणाचे प्ररामूल्य (मापदंड), दूषित करणारे घटक, प्रतिजैवक अवशेष आणि सूक्ष्मजीवशास्त्रीय निर्देशक या बाबी तपासल्या जातील. एफएसएसआयएने २०११ पासून दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या तपासणीसाठी पाच देशव्यापी सर्वेक्षणे केली आहेत.