IPS Puran Kumar suicide Case : हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येप्रकरणी कारवाईस सुरुवात झाली आहे. पोलीस अद्याप या प्रकरणाचा गुंता सोडवू शकले नसले तरी याप्रकरणी पहिली मोठी कारवाई झाली आहे. हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. पूरन कुमार यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलीस महासंचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांना रजेवर पाठवण्यात आलं आहे.

वाय. पूरन कुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती जी तपास करणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या सुसाइड नोटमध्ये त्यांनी कार्यालयातील समस्यांचा उल्लेख केला होता. तसेच हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रूजीत कपूर व रोहतकचे पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजारनिया यांची नावं नमूद केली होती. बिजारनिया यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. तर हरियाणा सरकारने आता पोलीस महासंचालकांना रजेवर धाडलं आहे.

सुसाइड नोटमध्ये काय लिहिलंय?

पूरन कुमार यांनी नऊ पानांची सुसाइड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये १३ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद, बेकायदेशीर पदोन्नती, जातीय भेदभाव, प्रशासनिक छळ यांसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी मुख्यमंत्री व अनेक वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना पत्रे लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या सुसाइड नोटमध्ये देखील या बाबी नमूद होत्या.

गृह मंत्रालयाच्या नियमांचं उल्लंघन, अनुसूचित जातीच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बाबतीत होणारा भेदभाव, त्यांच्या नियुक्त्यांमधील पक्षपाती वागणूक याबाबत त्यांनी काही मुद्दे लिहून ठेवले आहेत. १३ अधिकाऱ्यांवर त्यांनी छळ व प्रशासनिक कारकिर्दीचं नुकसान करण्याचे आरोप केले आहेत. सर्वाधिक आरोप हे पोलीस महासंचालक व रोहतकच्या पोलीस अधीक्षकांवर आहेत.

पूरन कुमार यांच्या आत्महत्येचं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस व या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेलं विशेष तपास पथकाने (एसआयटी) आतापर्यंतच्या तपासापद्दल माहिती दिलेली नाही. आत्महत्येच्या नऊ दिवस आधी (२९ सप्टेंबर रोजी) पूरन कुमार यांच बदली झाली होती. त्यांना पोलीस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली होती. पीटीसी सुनारियाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. आत्महत्या केली तेव्हा ते रजेवर होते.