इराणने बलुचिस्तान प्रांतातील जैश उल-अदल या दहशतवादी गटाच्या दोन महत्त्वाच्या तळांवर क्षेपणास्रे आणि ड्रोनने हल्ला चढवला. या हवाई हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून दोन मुली जखमी झाले असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)ने, बलुचिस्तान प्रांतातील जैश उल-अदल या दहशतवादी गटाचे दोन तळ ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त केल्याचं वृत्त आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मेहर या इराणी सरकारी वृत्तसंस्थेनुसार, कुहे सब्ज भागात जैश उल-अदलचे तळ हे दहशतवादी गटाच्या सर्वात मोठ्या तळांपैकी एक आहेत. या तळांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने नष्ट करण्यात आलं आहे. या हलल्यावरून पाकिस्तानने बुधवारी पहाटे निवेदन जारी केले. त्यानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्यामुळे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा >> २४ तास पुरेशी सुरक्षा आणि ‘वॉर रूम’; विमानांचा विलंब टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना

“या हवाई हल्ल्यात दोन लहान मुले मारली गेली आणि तीन मुली जखमी झाल्या आहेत. ही घटना संपूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात”, असेही पाकिस्तानच्या निवेदनात म्हटलं आहे. मात्र, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने घटनेचे ठिकाण सांगितले नाही. इराणच्या हल्ल्यांना बेकायदेशीर कृत्य म्हणून निषेध करून, पाकिस्तानने तेहरानमधील इराणच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तीव्र निषेध नोंदवला. इस्लामाबादने या घटनेबाबत इराणच्या चार्ज डी अफेअर्सनाही बोलावले आहे. “परिणामांची जबाबदारी पूर्णपणे इराणवर असेल,” असे त्यात म्हटले आहे.

दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताचे माहिती मंत्री जान अचकझाई यांनी हल्ल्याबाबत माहिती दिली नाही. पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क शाखेचा संदर्भ देत ते म्हणाला, “ISPR च्या प्रतिसादानंतरच याबाबत माहिती मिळू शकेल. तर, पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क शाखेनेही याबाबत अद्यापही अधिकृत माहिती दिलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इराक आणि सीरियामध्येही हल्ला

जैश उल-अदल या दहशतवादी गटाने यापूर्वी पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात इराणी सुरक्षा दलांवर हल्ले केले आहेत, असे रॉयटर्सने वृत्त दिले आहे. तत्पूर्वी, इराणने इराकच्या अर्ध-स्वायत्त कुर्दिस्तान प्रदेशातील इस्रायलच्या मोसाद गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. तसंच, इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाच्या विरोधात सीरियामध्येदेखील इराणे हल्ला केल्याचं विदेशी वृत्तांमधून स्पष्ट होत आहे.