Israel Iran Conflict Updates : इस्रायल-इराणमधील संघर्ष आणखी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांकडून एकमेकांच्या शहरांत मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरु आहेत. इस्त्रायलने इराणमधील तेहरानला टार्गेट करत अनेक हवाई हल्ले केले, तर दुसरीकडे इराणनेही इस्रायलमधील काही शहरांना टार्गेट केलं आहे. इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागलेल्या इस्रायलच्या अनेक इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणच्या प्रमुख लष्करी कमांडरचा देखील खात्मा झाला आहे.

इराणच्या प्रमुख लष्करी कमांडरचा खात्मा झाल्यानंतर आता इराण आणखी आक्रमक पद्धतीने हल्ले करत असल्याचं पाहायला मिळत आहे. इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात तेल अवीव आणि बेयर शेवा या शहरावर इराण हल्ले करत आहे. इराणने इस्रायलमधील एका रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेत ४० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर इराणने इस्रायलच्या तेल अवीवमधील इस्रायली स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या संदर्भातील वृत्त इकोनॉमिक्स टाइम्सने दिलं आहे.

इस्रायल आणि इराणमधील संघर्षाची तीव्रता वाढली असून इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रात इस्रायलच्या दक्षिण भागातील मुख्य रुग्णालयासह आदी महत्वाचे भाग उद्ध्वस्त झाले आहेत. यातच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचं अस्तित्वही उरणार नाही, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी दिला आहे. त्यामुळे हा सघर्ष येणाऱ्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘इराणकडून मोठी किंमत वसूल केली जाईल’, इस्रायलचा इशारा

दक्षिण इस्रायलमधील सोरोका मेडिकल सेंटरवर गुरूवारी पहाटे इराणचे क्षेपणास्त्र येऊन आदळले आणि एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले असून भरपूर नुकसान झाल्याचं इस्रायल सरकारच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. दरम्यान मेडिकल सेंटरवर हल्ल्या केल्याची इराणकडून मोठी किंमत वसूल केली जाईल, असा इशारा इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला दिला इशारा

इस्त्रायल आणि इराणमधील संघर्षाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल माध्यमावर एक पोस्ट करत इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्याबाबत आतापर्यंतचं सर्वात मोठं विधान केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, “आम्हाला माहित आहे की तथाकथित सर्वोच्च नेते (इराणचे सर्वोच्च नेते) कुठे लपले हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. ते सोपे टार्गेट आहेत, पण ते तिथे सुरक्षित आहेत. आम्ही त्यांना बाहेर काढणार नाहीत (मारणार नाही)किमान सध्या तरी नाही. पण आम्हाला नागरिकांवर किंवा सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत. पण आमचा संयम सुटत चालला आहे”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे.