IRCTC Scam : बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला असल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीत एकीकडे भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि दुसरीकडे राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेस अशी महाआघाडी आणि आणखी काही स्थानिक पक्ष अशी लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या घडामोडी सुरू असताना आणि बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांना मोठा धक्का बसला आहे. आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात दिल्लीतील राउज ॲव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने महत्वाचे आदेश दिले आहेत.

आयआरसीटीसी प्रकरणात लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

या प्रकरणाबाबत न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर न्यायालयाने लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले. यावेळी न्यायालयाने नमूद केलं की, ‘संबंधित नेते षड्यंत्र रचण्यात सहभागी होते आणि सार्वजनिक सेवक म्हणून त्यांच्या पदाचा गैरवापर करत होते.’

दरम्यान, सीबीआयने तपासलेला हा खटला बीएनआर रांची आणि बीएनआर पुरी या दोन आयआरसीटीसी हॉटेल्सच्या देखभाल कामाच्या कंत्राटांच्या वाटपामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. या प्रकरणात सीबीआयने आरोप केला आहे की या संदर्भातील कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आलं होतं.