वृत्तसंस्था, तेल अविव, तेहरान
इराणबरोबर सुरू असलेल्या लष्करी संघर्षात इस्रायलने पुन्हा एकदा त्या देशाच्या अणुसंशोधन केंद्राला लक्ष्य केले. शुक्रवारी रात्रीतून इराणच्या केंद्रावर हल्ला केला आणि त्यांच्या तीन वरिष्ठ कमांडरना ठार केले अशी माहिती इस्रायलच्या लष्कराने दिली. तिघांपैकी सईद इजादी हा हमासशी संबंधित असून तो ७ ऑक्टोबर २०२३च्या हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असल्याचा दावा इस्रायलने केल्याचे ‘बीबीसी’चे वृत्त आहे.
इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे संपवण्याच्या उद्दिष्टपूर्तीचा भाग म्हणून इस्रायलने इस्फाहान भागातील दोन सेंट्रिफ्युज केंद्रांना लक्ष्य केले. इराणमधील इतर सेंट्रिफ्युज उत्पादन केंद्रावर अलिकडे केलेल्या हल्ल्यांपेक्षा हा अधिक सुनियोजित असल्याचे इस्रायलच्या अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. या केंद्रांमध्ये युरेनियम समृद्धीकरणाचे काम सुरू असल्याचा इस्रायलचा दावा आहे. इराणने आपल्याकडे अण्वस्त्र असल्याचे वारंवार नाकारले आहे.
‘अमेरिकेने सहभागी होऊ नये’
अमेरिकेने या संघर्षात सहभागी होऊ नये असा इशारा इराणने शनिवारी दिला. ‘‘तसे झाल्यास ते अतिशय धोकादायक असेल,’’ असे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघाची म्हणाले. त्यांनी शुक्रवारी जीनिव्हामध्ये युरोपीय महासंघाचे राजनैतिक अधिकारी आणि फ्रान्स, जर्मनी व ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली. मात्र, त्यामधून कोणताही मार्ग निघू शकला नाही. चर्चेच्या पुढील फेरीसाठी तारीखही ठरवली गेली नाही.
सरकारच्या भूमिकेवर सोनिया गांधींची टीका
इस्रायलने गाझा आणि इराणवर केलेल्या हल्ल्यांच्या मुद्द्यावर केंद्राने मौन बाळगल्याबद्दल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी शनिवारी एका लेखात टीका केली. भारताचे शांत राहणे हे केवळ आपला आवाज गमावणे नाही तर मूल्यांची शरणागती असल्याचे त्यांनी लिहिले आहे. भूमिका घेण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही असेही त्यांनी म्हटले आहे.