मध्य पूर्व आशियामध्ये सुरु असणारा इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक चिघळत चालला आहे. हमासने इस्राएलवर गुरुवारी रॉकेट हल्ले केले तर इस्राएलने गाझावर जोरदार हवाई हल्ले करून त्याला प्रत्युत्तर दिले. हमासने गुरुवारी इलियटजवळ असणाऱ्या इस्रायलमधील रेमन विमानतळावर रॉकेट हल्ला केला. एक मोठं रॉकेट आम्ही या विमातळावर डागल्याचं हमासनं म्हटलं आह. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार इस्रायलचे मुख्य शहर असणाऱ्या तेल अवीववर होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ज्या रेमन हवाईतळावर विमान डायव्हर्ट करण्यात आलेली त्याच विमानतळावर हमासनं रॉकेट हल्ला केलाय. मात्र इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी अशाप्रकारचा कोणताही रॉकेट हल्ला रेमन विमानतळावर झालेला नसल्याचं रॉयटर्सशी बोलताना म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> Explained: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये संघर्ष का सुरु आहे?; जाणून घ्या चार प्रमुख कारणं

यापूर्वी इस्रायलच्या लष्कराने गाझा शहरावर १५०० हून अधिक रॉकेट्स डागले. हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेविरोधात इस्रायलनं केलेली ही मोठी कारवाई होती. हमासचे ११ कमांडर या हल्ल्यांमध्ये मारले गेले. या संघर्षामध्ये आतापर्यंत ७९ पॅलेस्टीनी नागरीकांनी जीव गमावला आहे. तर इस्रायलमधील सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका सहा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. दरम्यान अशाच प्रकारे दोन्हीकडून हल्ले होत राहीले आणि तणाव वाढत गेला तर इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये युद्ध होऊ शकतं, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे.

या संघर्षामध्ये इराण समर्थक हमासचे दहशतवादी गाझामधून इस्रायलवर रॉकेट्सचा हल्ला करत आहेत तर दुसरीकडे याला उत्तर म्हणून इस्रायल फायटर जेट विमानांमधून गाझा पट्टीमध्ये बॉम्ब हल्ले करत आहे. इस्रायलने बुधवारी केलेल्या एका हवाई हल्ल्यामध्ये गाझा शहरातील एक बहुमजली इमारत पाडली. या इमारतीमध्ये हमासचे कार्यालय असल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यानंतर दोघांमधील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे. या इमारतीवर हल्ला झाल्यानंतरच हमासने तेल अवीववर रॉकेट हल्ले केले. सोमवारपासून हमासने इस्रायलवर १६०० हून अधिक रॉकेट्स डागल्याचा आरोप इस्रायलच्या लष्कराने केला आहे. यापैकी ४०० रॉकेट्स गाझा पट्टीमध्येच पडली. इस्रायलच्या आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टीम या प्रणालीने सुमारे शंभर रॉकेट्स आकाशातच निकामी केले. आयर्न डोम ही इस्रायलची लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे हाणून पाडण्याची प्रणाली आहे. २०११ पासून ही यंत्रणा उपयोगात आहे.

११ कमांडर ठार झाल्यानंतरही हमास या संघर्षामधून मागे हटण्यास तयार नसल्याचं या विषयातील जाणकार सांगतात. हमासकडे सध्या एवढे रॉकेट्स आहेत की पुढील दोन महिने ते इस्रायलवर हल्ला करु शकतात. इस्रायलच्या लष्कारने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार गाझा पट्ट्यात हमासकडे एकूण २० ते ३० हजार रॉकेट्स आहेत. इस्रायलनेही हमासच्या दहशतवाद्यांना कायमचं शांत करुनच हा संघर्ष कायमचा संपवण्याची भाषा केलीय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, हमासला या आक्रामकतेची खूप किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा दिला आहे. “ही तर केवळ सुरुवात आहे. येत्या काही दिवसांमध्ये हमासच्या काही वरिष्ठ कमांडर्सला आम्ही लक्ष्य करणार आहोत,” असंही नेतन्याहू यांनी सांगितलं आहे. इस्रायल आणि हमासमधील या युद्धामुळे जगभरात दोन गट पडले आहेत. एकीकडे इराणसहीत सर्व इस्लामिक देशांनी इस्रायलवर टीका केली असतानाच दुसरीकडे अमेरिकने इस्रायलचं समर्थन केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel palestine conflict hamas says we fired rocket at ramon airport israel refuses the claim scsg
First published on: 14-05-2021 at 08:09 IST