जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना टोकियोमध्ये शासकीय इतमामात आज अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींकडून आबे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी ७०० परदेशी पाहुणे उपस्थित होते.

जपानच्या नारा शहरातील प्रचारसभेदरम्यान आबे यांची ८ जुलैला हत्या करण्यात आली होती. यानंतर त्यांच्या पार्थिवावर १५ जुलैला अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर शिंजो आबेंवर जपान सरकारकडून आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला जपानी जनतेकडून विरोध करण्यात आला होता. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची अंत्यसंस्कार कार्यक्रमाआधी भेट घेतली. आबे यांनी भारत आणि जपानचे संबंध अधिक उंचीवर नेले, असे पंतप्रधान मोदी या भेटीत म्हणाले. किशिदा यांच्या नेतृत्वात दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होईल, असेही मोदी यांनी या भेटीनंतर म्हटले आहे.

शिंजो आबे हे जपानमधील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते. जपानच्या पंतप्रधानपदावर ते सर्वाधिक काळ होते. २००६ ते २००७ आणि २०१२ ते २०२० या काळात त्यांनी जपानचे पंतप्रधानपद भुषवले. दीर्घ आजारामुळे या पदावरून पायउतार होणार असल्याचे आबे यांनी ऑगस्ट २०२० मध्ये जाहीर केले होते.