आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील सत्ताधारी संयुक्त जनता दलाने(जदयु) उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर केली. लोकसभा अध्यक्षा व काँग्रेसच्या उमेदवार मीरा कुमार यांच्याविरोधात ‘जदयु‘ने विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांना काँग्रेसने सासाराम लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. त्यांच्याविरोधात नारायण चौधरींच्या रूपाने ‘जदयु‘नेही तगडा उमेदवार दिला आहे. जामुई मतदारसंघातून माजी प्रशासकिय अधिकारी के. पी. रामय्या यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबरोबरच औरंगाबाद येथून बग्गीकुमार वर्मा, काराकत येथून महाबली सिंह, गया येथून जीतन राम मांजी आणि नावाडा येथून कौशल यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जदयुचे प्रदेशाध्यक्ष बशिष्ठ नारायणसिंह यांनी सांगितले, की आता फक्त आठच उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्ष अजूनही एकसंध असून, पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. लवकरच इतर उमेदवारांची घोषणा करण्यात येईल. होळीनंतर इतर उमेदवारांची घोषणा करण्यात येईल. आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या मतदारसंघात 10 एप्रिलला मतदान होणार आहे.