नवी दिल्ली :  जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (‘जेएनयू’) कधीही देशद्रोही नव्हते किंवा तुकडे-तुकडे टोळीचा भाग नव्हते असे विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी गुरुवारी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत ठामपणे सांगितले. ‘जेएनयू’मध्ये नेहमीच मतभेद, वादविवाद आणि लोकशाहीला चालना दिली जाईल असे त्या म्हणाल्या. पंडित या स्वत: ‘जेएनयू’च्या विद्यार्थिनी आहेत.

आपण कुलगुरूपदाचा प्रभार स्वीकारला तेव्हा विद्यापीठाच्या आवारात ध्रुवीकरण झाले होते असे त्यांनी सांगितले. तो दुर्दैवी टप्पा होता, असे पंडित म्हणाल्या. विद्यार्थी आणि प्रशासन अशा दोन्ही बाजूंनी चुका झाल्या आणि त्या हाताळण्यामध्ये नेतृत्वाला अपयश आले असे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>> पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान; १९ राज्यांमधील १०२ मतदारसंघ सज्ज

पंडित यांनी २०२२मध्ये कुलगुरूपद हाती घेतले तेव्हा विद्यापीठाच्या आवारात कथितरित्या देशद्रोही घटक असल्याचे २०१६चे आरोप पुरते विरले नव्हते. त्याबद्दल विचारले असता पंडित म्हणाल्या की, ‘‘तो एक टप्पा होता, त्यावेळी दोन्ही बाजूंनी चुका झाल्या. त्यावर नियंत्रण ठेवण्यात नेतृत्व कमी पडले असे मला वाटते. कोणत्याही विद्यापीठात १० टक्के माथेफिरू असतात. हे केवळ ‘जेएनयू’च्या बाबतीत नाही. हे नेतृत्वाबद्दल आहे, टोकाची मते असलेल्या लोकांना आपण कसे हाताळतो त्याबद्दल आहे. पण आम्ही देशद्रोही किंवा तुकडे-तुकडे टोळी आहोत असे मला वाटत नाही’’.

संघाशी संबंध लपवले नाहीत!

शांतीश्री पंडित यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे मान्य केले आणि ही बाब लपवण्याचा कधी प्रयत्न केला नाही किंवा त्याबद्दल खेद वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘जेएनयू’ला सर्वोच्च ‘क्यूएस रँकिंग’ मिळवून देणाऱ्या ‘संघी’ कुलगुरू असा आपला उल्लेख होतो तेव्हा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जेएनयू’चे भगवेकरण केले जात असल्याचे आरोप त्यांनी फेटाळले. विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजासंबंधी केंद्र सरकारकडून कोणताही दबाव नसल्याचा दावा त्यांनी केला. एक विद्यापीठ म्हणून आपण या सर्वांपेक्षा (भगवेकरण) वर असायला हवे. ‘जेएनयू’ हे देशासाठी आहे, कोणत्याही एका विशिष्ट ओळखीसाठी नाही. ‘जेएनयू’ सर्वसमावेशकता आणि विकासासाठी आहे. ते नेहमीच सात डींसाठी – डेव्हलपमेंट (विकास), डेमोक्रॅसी (लोकशाही), डिसेंट (मतभेद), डायव्हर्सिटी (विविधता), डिबेट अँड डिस्कशन (वाद आणि चर्चा), डिफरन्स अँड डिलिबरेशन (मतभिन्नता आणि विचारमंथन) – भूमिका घेते असे मी म्हणते. – शांतीश्री पंडित, कुलगुरू, ‘जेएनयू’