शिवमोगा, धारवाड : कर्नाटकातील हुबळी-धारवाड महापालिकेचे काँग्रेस नगरसेवक निरांजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिरेमठच्या हत्येचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी केली. तसेच या खटल्याचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी विशेष न्यायालय स्थापन केले जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

दुसरीकडे, नेहाच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि तिच्या कुटुंबाबद्दल एकजूट दाखवण्यासाठी धारवाडमधील मुस्लीम संघटनांनी अर्ध्या दिवसाचा बंद पाळला. तर, भाजपने हत्येच्या निषेधार्थ राज्यव्यापी निदर्शने केली.

नेहा हिरेमठ या २३ वर्षीय विद्यार्थिनीची १८ एप्रिलला बीव्हीबी महाविद्यालयाच्या आवारात धारदार हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली होती. नेहा मास्टर ऑफ कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनची (एमसीए) पहिल्या वर्षांची विद्यार्थिनी होती. कर्नाटक पोलिसांनी तिच्या हत्येच्या आरोपाखाली तिचा सहाध्यायी फयाज खोंदुनैक याला अटक केली आहे. नेहाचे वडील निरांजन हिरेमठ हे हुबळी-धारवाड महापालिकेचे काँग्रेस नगरसेवक आहेत.

हेही वाचा >>> पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का

या हत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापले आहे. तसेच त्याला काँग्रेस विरुद्ध भाजप असे वळण लागले आहे. ही हत्या वैयक्तिक कारणाने झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे, तर हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. तसेच राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेचे उदाहरण आहे, अशी टीका भाजपने केली आहे.

‘‘आम्ही या हत्येचा तपास ‘सीओडी’कडे (सीआयडी) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम्ही विशेष न्यायालयाची स्थापना करू’’, असे सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विशिष्ट मुदतीत आरोपपत्र दाखल करून खटल्याचा निपटारा करण्यासाठी विशेष न्यायालयाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुस्लीम संघटनांचा बंद

धारवाड : नेहाच्या हत्येचा निषेध करण्यासाठी, तसेच तिच्या कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘अंजुमन-इ-इस्लाम’च्या  नेतृत्वाखाली मुस्लिंमांनी निदर्शने केली, तसेच आरोपी फयाजचा निषेध केला. मुस्लीम व्यापाऱ्यांच्या मालकीची दुकाने अर्धा दिवस बंद ठेवण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपची काँग्रेसवर टीका 

बंगळूरु : भाजपच्या कर्नाटक शाखेने सोमवारी राज्यव्यापी निदर्शने केली. राज्य सरकारच्या कथित लांगूलचालनाच्या राजकारणामुळे हा प्रसंग घडल्याचा भाजपचा आरोप आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बंगळूरुमधील रामेश्वरम कॅफेमधील स्फोट, धार्मिक स्तोत्रे म्हणणाऱ्या युवकावरील हल्ला या घटनांचाही निषेध केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी मैसुरूमध्ये तर विरोधी पक्षनेते आर अशोका यांनी तुमकुरूमध्ये तसेच माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हावेरीमध्ये निदर्शनांचे नेतृत्व केले.