Kashmiri Man Accused of Stealing Paraded Shirtless : जम्मूमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. येथील एका सरकारी रुग्णालयाच्या आवारातून चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी एका २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या अटकेपूर्वी त्याला अर्धनग्न करून पोलीस व्हॅनच्या बोनेटवर बसवण्यात आलं होतं, त्याचे हात पाठीमागे बांधले होते, गळ्यात चप्पलांचा हार घालून त्याची धिंड काढण्यात आली होती. त्याला व्हॅनच्या बोनेटवर बांधून फिरवण्यात आलं होतं.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जम्मूचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जोगिंदर सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. सिंह यांनी या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश, आठवडाभरात अहवाल येणार

वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देताना म्हटलं आहे की “सदर पोलीस कर्मचाऱ्याचं वर्तन हे पोलीसी पेशाला अशोभनीय असं आहे. ही एका शिस्तबद्ध संस्थेतील कर्मचाऱ्याला न शोभणारी कृती आहे. अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याचं काम सोपवलं आहे आणि त्यांना एका आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

या घटनेशी पोलिसांचा संबंध नसल्याचा दावा

संशयित चोर म्हणून ज्या तरुणाची धिंड काढण्यात आली होती त्याचं नाव इशराक अहमद असं असून तो मूळचा उरी तालुक्यातील परमपिल्लन येथील रहिवासी आहे. सध्या तो जम्मूच्या कासिम नगर भागात वास्तव्यास आहे. दरम्यान, बक्षी नगर पोलीस ठाण्याचे (याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली आहे) स्टेशन हाऊस ऑफिसर, पोलीस निरीक्षक आझाद मनहास यांनी या घटनेत पोलिसांचा कसलाही सहभाग नव्हता असं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलीस निरीक्षक आझाद मनहास म्हणाले, “सदर इसमाने रुग्णालयाबरोबर एका रुग्णाच्या नातेवाईकाला लुटण्याच्या प्रयत्न केला होता. मात्र, लोकांनी त्याला पकडलं. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले. त्याआधीच लोकांनी त्याला मारहाण केली होती. गेल्या आठवड्याभरातील ही त्याची तिसरी चोरी होती. पोलिसांनी त्याची धिंड काढली नाही. उलट आम्ही त्याला जमावापासून वाचवलं. आम्ही त्याला आमच्या व्हॅनमध्ये बसवलं. मात्र, जमावाने त्याला व्हॅनमधून बाहेर काढलं. त्याला अर्धनग्न करून जीपच्या बोनेटवर बसवलं. त्याच्या गळ्यात चप्पलांचा हार घातला. त्याचे हात पाठीमागे बांधले”.